July 17, 2024

Samrajya Ladha

“ड्रग्जचे व्यसन घरात येण्याची वाट पाहू नका” अभिनेता रमेश परदेशी यांचे आवाहन. सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने पथनाट्याचा शुभारंभ

पुणे :

पुण्याच्या वाढत्या शहरीकरणाबरोबर ड्रग्जचे व्यसन आधी वेशीवर आले नंतर मध्यवस्तीत आले, आता आपल्या भागात आले असून अत्यंत घातक असणारे हे व्यसन घरात येण्याची वाट पाहू नका, ते हद्दपार करण्यासाठी समाजात जनजागृती करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे मत अभिनेता रमेश परदेशी (पिट्या भाई) यांनी व्यक्त केले.

तरुण पिढीला ड्रग्ज आणि अमली पदार्थापासून दूर ठेवण्यासाठी सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने दीर्घकालीन, व्यापक जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेचा भाग म्हणून शहराच्या विविध भागात फाउंडेशनच्या माध्यमातून पथनाट्य सादर केली जाणार आहेत. या पथनाट्याचा शुभारंभ परदेशी यांच्या हस्ते कलाकार कट्टा येथे करण्यात आला.

कार्यक्रमाचे संयोजक माजी नगरसेवक सनी विनायक निम्हण, अभिनेता अक्षय वाघमारे, माजी नगरसेवक आदित्य माळवे यांची प्रमुख उपस्थिती होती.

निम्हण म्हणाले, “अमली पदार्थ हद्दपार करण्यासाठी पुणेकरांनी एकत्र यावे या उद्देशाने हे अभियान हाती घेण्यात आले आहे. जनजागृती, मार्गदर्शन, व्यसनमुक्ती, औषधोपचार या सूत्रानुसार अमली पदार्थ हद्दपार होईपर्यंत अभियान राबविण्यात येणार आहे.”

वाघमारे म्हणाले, “पुणे शहराला पाश्चात्य संस्कृतीचा विळखा बसत आहे. अनिष्ट गोष्टींना विरोध करण्यासाठी युवक पुढे येत आहेत ही समाधानाची गोष्ट आहे. जनजागृती करणाऱ्या कार्यक्रमांची संख्या वाढली पाहिजे.”

अमित मुरकुटे, टिंकू दास, अनिकेत कपोते, गणेश शेलार, गणेश शिंदे, प्रमोद कांबळे, अभिषेक परदेशी यांनी संयोजन केले.