July 17, 2024

Samrajya Ladha

केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून डॉ. पंकज महाराज गावडे यांचे पंढरपूर मध्ये जाहीर कीर्तन

पेरिविंकल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल यांच्यावतीने अभिनंदन व सत्कार..

पुणे :

अयोध्या येथे श्रीरामलल्ला समोर गर्भगृहात कीर्तन करणारे विश्वातील पहिले कीर्तनकार म्हणून ज्यांना ओळखले जाते ज्यांचे नुकतेच उत्तराखंड ऋषिकेश येथे ही कीर्तन झाले. असे राष्ट्रीय कीर्तनकार, जगद्गुरुकृपांकित भाषाप्रभू, ह. भ. प. डॉ. पंकज महाराज गावडे यांचे भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून पंढरपूर येथे जाहीर कीर्तन रविवार, दिनांक २३ जून २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता होणार आहे. ज्याला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

सांस्कृतिक मंत्रालयाकडून संपूर्ण देशामध्ये कला प्रवाह हा मंदिर उत्सव कार्यक्रम तेथील आध्यात्मिक व ऐतिहासिक परंपरा याची नोंद होऊन मानवी जीवनाला आकार देणाऱ्या या अभिजात प्रबोधनाच्या वेगवेगळ्या परंपरा जगापुढे याव्या या उद्देशाने प्रत्येक राज्यात काही मंदिरांची निवड करून तेथे होत आहे. यात महाराष्ट्रामधील वारकरी संप्रदायाचे अधिष्ठान पंढरपूर येथील पांडुरंगाच्या मंदिराची निवड केली गेली. सदर कला प्रवाह मंदिर उत्सव कार्यक्रम हा २३ व २४ जून असे दोन दिवस पंढरपूर येथे भव्य प्रमाणात साजरा होणार असून ज्यात महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, आंध्रप्रदेश, छत्तीसगड, दिल्ली येथील नामांकित अभ्यासक विविध पारंपरिक पद्धतीने तेथील आध्यात्मिक प्रयोग सादर करणार आहेत.

“राष्ट्रीय पातळीवरील या मंदिर उत्सव उपक्रमांतर्गत वारकरी कीर्तन या प्रकारासाठी उच्चशिक्षित असणारे राष्ट्रीय कीर्तनकार डॉ. पंकज महाराज गावडे यांचे वारकरी संप्रदायासाठी असलेले संपूर्ण जिवन समर्पण, त्यांची भक्ती, ज्ञान, वक्तृत्व व निरूपण करण्याची विशिष्ट व प्रभावी पद्धत या कारणांमुळे निवड झाली असेल आणि ही संपूर्ण पुणे शहरासाठी अभिमानाची गोष्ट आहे या भावना सहकार व नागरी उड्डाण केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहळ यांनी व्यक्त केल्या.”

सदर कार्यक्रमात वारकरी कीर्तनाबरोबरच भारुड, सप्तखंजिरी भजन, कथक, पंडवानी, दशावतार, मयूर रास, भरतनाट्यम असे भव्य कार्यक्रम आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवर नामांकित व्यक्ती सादर करणार आहेत. यात वारकरी दिंडीचे ही आयोजन केले गेले आहे ज्यात अनेक प्रकारच्या भजनाच्या वारकरी पावल्या, फुगडी, रिंगण, इत्यादी प्रकारही सादर होतील. सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने त्यांची अंगीकृत संस्था संगीत नाटक अकादमी, नवी दिल्ली सदर उत्सवाचे व्यवस्थापन पाहणार असून ज्याला स्थानिक पातळीवर सोलापूर जिल्हा अधिकारी व त्यांचे प्रशासन व श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्ट, पंढरपूर हे सहकार्य करणार आहेत. राष्ट्रीय कीर्तनकार डॉ. पंकज महाराज गावडे यांच्या अयोध्या येथील किर्तनानंतर या राष्ट्रीय उत्सवासाठी देखील त्यांना निमंत्रित केल्याबद्दल अनेक क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे.

यानिमित्त पेरिविंकल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल यांच्यावतीने डॉ. पंकज महाराज गावडे यांचा सत्कार व अभिनंदन करण्यात आला. महाराजांना मिळणारा मान हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब असल्याचे बांदल यांनी सांगितले.