November 21, 2024

Samrajya Ladha

औंध परिसरात भयमुक्त वातावरण निर्मितीसाठी आमचा प्रयत्न : पोलिस आयुक्त अमितेश कुमार

औंध :

“औंध परिसरातील नागरीकांसाठी भयमुक्त वातावरण निर्माण ‌करून ‘झीरो क्राईम’ करण्यासाठी प्रामाणिकपणे युध्दपातळीवर प्रयत्नशील आहोत” असे आश्वासन पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी औंध येथे प्रत्यक्ष येऊन नागरिकांना दिले. गेल्या आठवड्यात गुरुवारी(ता.१३) टोळक्याच्या मारहाणीत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला होता. तसेच औंधमध्ये लगेचच तीन ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या. या पार्श्वभूमीवर औंधच्या नागरीकांशी संवाद साधण्यासाठी आयुक्त अमितेशकुमार आले होते.

यावेळी जेथे मारहाण झाली त्या घटनास्थळाची व वेस्टएंड चौक ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकादरम्यान काही ठिकाणांची आयुक्तांनी ॲड.मधुकर मुसळे, अर्चना मुसळे व स्थानिक नागरिकांसह पायी चालत पाहणी केली व सुरक्षेचा आढावा घेतला.

‘औंध परिसरात या घटनेमुळे निर्माण झालेली असुरक्षिततेची भावना स्वाभाविक असून भयमुक्त वातावरण निर्मितीसाठी आमचा प्रयत्न आहे. रस्त्यावर व पदपथावर कोणीही व्यवसाय करणार नाही व वाहतूकीला अडथळा ठरणा-या संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. परिसराला शिस्त लावण्यासाठी मनुष्यबळ पुरवण्यासह गुन्हेगारांवर वचक राहण्यासाठी व्यूहरचना केली जाईल.परिसरातील फेरीवाले,पथारी व्यावसायिक,हातगाडी, टप-या किंवा झोपडपट्टीच्या आसपास कुठलीही बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही‌ व संबंधितांवर कठोर कारवाई करावी यासाठी पोलिसांना सूचना दिल्या असून येत्या आठ दिवसांत इथे येऊन पोलिसांनी केलेल्या कारवाईचा आढावा घेतला जाईल ‘ असेही आयुक्त यांनी सांगितले.

यावेळी अतिरिक्त आयुक्त मनोज पाटील, परिमंडळ-४ चे उपायुक्त विजयकुमार मगर, गुन्हे शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे, वाहतूक शाखेचे उपायुक्त रोहिदास पवार,सहायक पोलीस आयुक्त आरती बनसोडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश संखे,वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक शफिल पठाण यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.