July 27, 2024

Samrajya Ladha

पावसाळी कामे, नालेसफाई त्वरित करून नागरिकांची गैरसोय दूर करा, कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांचे पालिका प्रशासनास आदेश

औंध :

औंध-बाणेर क्षेत्रिय कार्यालयांतर्गत विविध ठिकाणी पहिल्याच पावसात पाणी साठल्याने नागरीकांना गैरसोयीचा सामना करावा लागला. यासंदर्भात मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पालिका आयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त व सर्व विभागाचे प्रमुख यांच्यासोबत बैठक घेऊन केलेल्या कामाचा आढावा घेतला. तसेच पावसाळ्यात पाण्यामुळे निर्माण होणाऱ्या प्रश्नावर स्थानिक लोकप्रतिनिधींसह चर्चा केली.

 

यावेळी आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले, उपायुक्त घनकचरा संदीप कदम, गणेश सोनुने,पथविभाग प्रमुख अनिरुद्ध पावसकर, पाणीपुरवठा विभागाचे नंदकिशोर जगताप, यांच्यासह माजी नगरसेवक अमोल बालवडकर, माजी नगरसेविका ज्योती कळमकर, माजी नगरसेविका स्वप्नाली सायकर, माजी नगरसेविका अर्चना मुसळे, गणेश कळमकर, लहू बालवडकर, राहूल कोकाटे, ॲड.मधुकर मुसळे, सचिन पाषाणकर आदी उपस्थित होते.

नालेसफाईचा केलेला दावा फोल ठरल्याचे दिसून आल्यामुळे आठ दिवसांत नाले सफाईची कामे करुन घेण्याची सूचना करुन १५ जूनला पुन्हा पाहणी करणार असल्याचे पाटील यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. पावसाचे पाणी साचते हे कारण नसून नाल्यांची सफाई होत नाही. हे कारण असल्याचे सांगून पाटील यांनी संबंधितांची कान उघाडणी केली. पाणी साचल्याने रस्ता कोंडून सगळी यंत्रणा कोलमडून जाते त्यामुळे सगळ्यांनी आपापली कामे करावीत अशा सूचनाही दिल्या.

तर नालेसफाईच्या निविदेतील जवळपास ८०टक्के काम पूर्ण झाले असून पाणी साचण्याची कारणे वेगळी असल्याचे आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले यांनी सांगितले.तसेच यापुढे काही ठिकाणी जेथे पाणी साचते अशी ठिकाणे संबंधित कर्मचाऱ्यांना कळवण्यात येतील असेही आयुक्त म्हणाले. क्षेत्रिय कार्यालयांतर्गत साडेबारा किमी नाले, ३९ कल्वर्ट्सची सफाई केल्याचे अधिक्षक अभियंता दिनकर गोजारे यांनी केलेल्या कामाची माहिती देताना सांगितले. तसेच दोन टप्प्यांत काम पूर्ण केले असून पहिल्या पावसात झाडांचा पालापाचोळा, कचरा चेंबरमध्ये अडकल्याने पाणी तुंबले जाते. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व विद्युत विभागाच्या समन्वयातून काम केले जाईल तसेच विद्यापीठ ते राधा चौक कल्वर्ट्स व नाले दोन वेळा साफ करून घेतले असून आवश्यकता असेल तिथे पुन्हा सफाई केली जाईल असेही गोजारे यांनी सांगितले.

यावेळी पाणी तुंबणे, विद्युत पुरवठ्यातील अडचणी, रस्त्याची रखडलेली कामे याविषयी सर्वांनी विषय मांडले.

 

You may have missed