September 8, 2024

Samrajya Ladha

पुण्यात ऑगस्ट मध्ये संविधान साहित्य संमलेन : सुनील माने

पुणे :

संविधानाने दिलेले अधिकार आणि संविधानातील विविध प्रावधानांबद्दल नागरिकांना अधिक माहिती व्हावी, या उद्देशाने संविधान फाऊंडेशन आणि कॅटलिस्ट फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या ऑगस्टमध्ये पुण्यात संविधान साहित्य संमेलन घेण्यात येणार आहे. अशी माहिती कॅटलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील माने यांनी दिली. याबाबत त्यांनी आज माजी सनदी अधिकारी तसेच संविधान फाउंडेशनचे अध्यक्ष ई.झेड खोब्रागडे यांची नागपूर येथे भेट घेतली.

 

याबाबत माहिती देताना माने म्हणाले, भारतीय संविधानाने नागरिकांना समान अधिकार प्रदान केले आहेत. भारतीय संविधान हे १४० कोटी भारतीयांचे व त्यांच्या कल्याणासाठी साकारले आहे. मात्र या संविधानाबद्दल लोकांना फार माहिती नाही. या संविधानाबाबत लोकजागृती व्हावी व त्यासाठी लोकांना समजेल अशा भाषेत साहित्य निर्मिती व्हावे हा या संमेलना पाठीमागील उद्देश आहे. यासाठी २०१९ मध्ये दीक्षाभूमी नागपूर मध्ये सर्वप्रथम संविधान साहित्य संमेलन घेण्यात आले होते. यासाठी माजी सनदी अधिकारी ई.झेड खोब्रागडे यांनी पुढाकार घेतला होता. याच धर्तीवर पुण्यात ही संविधान साहित्य संमेलन घेण्यात येणार आहे.

या संमेलनात राज्यातील आणि देशातील विविध तज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. देशभरातील अनेक मान्यवर, कायदेतज्ञ, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील अनेक तज्ञ, पुण्यातील विविध संस्था, संघटना यात सहभागी होणार आहेत.

वर्तमान स्थितीत देशातील राजकीय पक्ष, सनदी अधिकारी, न्यायपालिका, कायदेमंडळातील लोक यांच्यावर या संविधानातील तरतुदी तसेच योजनांचा वापर समाजातील दुर्लक्षित, उपेक्षित, वंचित आणि मागास असेलेल्या घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याची जबाबदारी आहे. मात्र याबाबत या क्षेत्रात काम करणारे लोक गंभीर आहेत का ? यासाठी ते प्रामाणिक प्रयत्न करतात का ? या संदर्भातही चर्चा करण्यात येणार आहे. तसेच संविधान तरतुदी राबवण्याबाबत येत असलेली आव्हाने आणि समस्या व वास्तव याबाबतही या संमेलनात उहापोह करण्यात येणार असल्याचे माने यांनी सांगिलते.

सतर्क नागरिकाची भूमिका बजावताना, अन्याया विरुद्ध आवाज उठवण्यासाठी आपल्याला अधिकार दिले आहेत. हा अधिकार आपल्याला भारतीय संविधानामुळे प्राप्त झाला आहे. संविधानाच्या माध्यमातून लोकशाही मार्गाने सरकारला व प्रशासनाला प्रश्न विचारत राहणे हे जिवंत लोकशाहीचे कर्त्यव्य आहे. मात्र संविधानाबाबत आणि संविधानाने दिलेल्या अधिकारांबद्दल आपल्याला माहिती नसल्यामुळे आपण गप्प बसतो हे सर्वात भयानक आहे. संविधानाबाबत आपल्याला माहिती नसल्यामुळे देशात संविधान संपुष्टात येऊन अराजकता निर्माण होईल. म्हणूनच या साहित्य संमेलनात मोठ्या संख्यने उपस्थित राहून जास्तीत जास्त लोकांपर्यंत संविधान पोहचवण्यासाठी प्रयत्न करा असे आवाहन माने यांनी केले आहे. या संमेलनात सहभागी होण्यासाठी पूर्व नोंदणी आवश्यक असणार आहे.