May 24, 2024

Samrajya Ladha

प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचा ९० वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा

शिवाजीनगर :

“प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी” चा ९० वा वर्धापनदिन शुक्रवार, दि. १० मे, २०२४ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना दिवंगत गुरूवर्य श्री. शंकरराव कानिटकर आणि त्यांच्या ५ सहकारी शिक्षकांनी १९३४ मध्ये “अक्षय्य तृतीया” या शुभ दिनी केली. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या वाटचालीतील प्रमुख शब्द “प्रोग्रेसिव्ह” आणि “मॉडर्न”.

‘प्रोग्रेसिव्ह’ म्हणजे काळ आणि नावीन्यपूर्णतेच्या भावनेला धरून राहणे, तर ‘आधुनिक’ म्हणजे शैक्षणिक, क्रीडा किंवा सांस्कृतिक उपक्रम असोत, अश्या सर्व बाबतीत अद्ययावत दृष्टिकोन. तसेच विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आधुनिक उपकरणे व आधुनिक पद्धतीचा वापर करण्याचा संकल्प त्या दिनी करण्यात आला जो अजूनही पाळला जातो.

१९३४ साली लावलेल्या या रोपट्याचे आता ९० वर्षानंतर एक मोठा वटवृक्षात रुपांतर झाले आहे. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी वेगवेगळ्या शैक्षणिक स्तरावर काम करत असून आज प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या अंतर्गत ६२ शाळा-महाविद्यालये आहेत. एकूण ७०,००० विद्यार्थ्यांना संस्था ज्ञानदानाचे काम करते. विविध क्षेत्रांमध्ये प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी आपले नाव मोठं करत आहे. कला, क्रीडा, शिक्षण, संशोधन, राजकारण सर्वच क्षेत्रामध्ये प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे विद्यार्थी प्रगती करत असून या सर्वच बाबतीत आज संस्था आघाडीवर आहे.

संस्थेच्या मॉडर्न अभियांत्रिकी महाविद्यालयाला विश्वविद्यालय अनुदान आयोगाकडुन ‘अ++’ आणि इतर महाविद्यालयांना ‘अ+’ नामांकन प्राप्त झाले आहे. तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाकडून ‘स्वायत्तता’ बहाल करण्यात आली आहे. पुढील काही वर्षात संस्थेचा ‘क्लस्टर युनिव्हर्सिटी’ करण्याचा मानस आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण – २०२० ची महाविद्यालयातून प्रभावीपणे अंमलबजावणी केली आहे.

संस्थेच्या अंतर्गत काम करणाऱ्या शाळा-महाविद्यालये शैक्षणिक क्षेत्रात अतिशय मोलाची कामगिरी करत आहेत. सामाजिक कार्यात देखील संस्था अग्रेसर आहे. तसेच संस्थेचे माजी विद्यार्थी आज विविध क्षेत्रात आघाडीवर असून समाजाच्या सर्वच क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करत आहेत.

संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयात प्रथेप्रमाणे वर्धापनदिनाचा प्रारंभ ब्राम्हवृंदांनी केलेल्या मंत्रजागराने झाला. मंत्रजागरानंतर सायंकाळी अनेक निमंत्रित मान्यवरांचे आगमन होण्यास प्रारंभ झाला. शिवाजीनगर येथील मॉडर्न हायस्कूल (इंग्लिश मिडियम) च्या प्रांगणात स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या स्नेहमेळाव्यास समाजातील विविध स्तरातील मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.

संस्थेचे कार्याध्यक्ष मा. डॉ. गजानन र. एकबोटे मनोगत व्यक्त करताना म्हणाले, “प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी ही एक आघाडीची शैक्षणिक संस्था म्हणून ओळखली जाते. सर्व स्तरातील विद्यार्थी इथे शिक्षण घेत आहेत. सर्व नियमांचे पालन करुन प्रत्येक शैक्षणिक संस्थेने जी कामगिरी केली आहे ती कौतुकास्पद आहे. संस्था इथून पुढेही नविन शैक्षणिक धोरणांचा अवलंब करुन, आधुनिक तंञज्ञानाचा वापर करून पुढे वाटचाल करत राहिल व एक चांगला विद्यार्थी व चांगला नागरिक घडविण्याचा वसा तसाच पुढे नेईलके”.

संस्थेचे हे ९० वे वर्ष असून याचे औचित्य साधून वर्षभर संस्थेच्या शाळा-महाविद्यालयांतून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे संस्थेचे कार्याध्यक्ष मा. प्रा. डॉ. गजानन र. एकबोटे यांनी सांगितले.

संस्था आज ९० वर्षाची प्रोग्रेसिव्ह असून मॉडर्न आहे. संस्थेने आयोजित केलेल्या स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे सर्व सदस्य, आजीव कार्यकर्ता मंडळाचे सर्व सदस्य, आजीव सदस्य मंडळाचे सर्व सदस्य तसेच संस्था संचलित सर्व शाळा-महाविद्यायाचे मुख्याध्यापक, प्राचार्य, संचालक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी असे सर्व उपस्थित होते.

हा स्नेहमेळावा प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष मा. प्रा. डॉ. गजानन र. एकबोटे, कार्यवाह प्रा. श्री. शामकांत देशमुख, सहकार्यवाह प्रा. श्री. सुरेश तोडकर, प्रा. डॉ. सौ. ज्योत्स्ना एकबोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे सदस्य, संस्थेवर प्रेम करणारे हितचिंतक, शिक्षणविभागातील अधिकारी, साविञिबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे महानगरपालिका, उच्च शिक्षण विभागातील पदाधिकारी, बँक अधिकारी तसेच विविध महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षण मंडळ, पुणे जिल्हा परिषद, कला, कायदे तज्ञ, वैद्यकीय, व्यवस्थापन, वर्तमान पत्र, पोलीस खात्यातील अनेक मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते. त्यांनी संस्थेच्या व कार्याध्यक्षांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.