कोथरुड :
शहराची पुढील पंचवीस वर्षांची गरज लक्षात घेऊन निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर शंभर टक्के प्रक्रिया करण्यासाठी मुळा-मुठा पुनर्जीवन प्रकल्प आणि नदीकाठ सुशोभिकरण प्रकल्प पूर्ण करणार असल्याची ग्वाही पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
मोरे विद्यालय परिसरात मोहोळ यांच्या प्रचारफेरीचे आयोजन करण्यात आले होते. प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्राताई वाघ, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष दीपक मानकर, माजी नगरसेविका मंजुश्रीताई खर्डेकर, नगरसेवक दीपक पोटे, नगरसेवक जयंत भावे, ऍड वर्षा डहाळे, पुनीत जोशी, डॉ. संदीप बुटाला, अनुराधा येडके, अपर्णा लोणारे, कुलदीप सावळेकर, मिताली सावळेकर, शंतनू खिलारे पाटील, विठ्ठल बराटे, हर्षवर्धन मानकर, दीपक पवार, सचिन थोरात, अजय मारणे, अभिजीत राऊत, संदीप मोरे, आशुतोष वैशंपायन यांचा प्रमुख सहभाग होता.
मोहोळ म्हणाले, “मुळा-मुठा पुनर्जीवन प्रकल्पात 11 नवीन अत्याधुनिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, 55 किलोमीटर लांबीच्या नव्या सांडपाणी वाहिन्या आणि दररोजची सांडपाणी प्रक्रिया क्षमता 396 दशलक्ष मीटरने एमएलडीने वाढणार आहे. सन 2046 मध्ये 99 लाख लोकसंख्येचा विचार करून प्रकल्पाची रचना करण्यात आली आहे. या प्रकल्पाशिवाय 500 कोटी रुपये खर्च करून जुन्या दहा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचे अत्याधुनिकरण सुरू आहे. या प्रकल्पाअंतर्गत 11 पैकी दहा प्रकल्पांचे बांधकाम पूर्णत्वाकडे असून, आयात केलेली विद्युत यंत्रणा पुण्यात पोहोचली आहे. सन 2025 च्या मध्यास काम पूर्ण होणे अपेक्षित आहे.”
मोहोळ पुढे म्हणाले, “नदीकाठ सुशोभिकरण या दुसऱ्या महत्त्वाच्या प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दोन वर्षांपूर्वी झाले. पहिल्या टप्प्यात येरवडा येथील डॉ. चिमा उद्यान येथे 350 मीटर लांबीचा पथदर्शी प्रकल्प पूर्ण केला असून, पहिल्या दोन टप्प्यांचे काम सुरू आहे. नदी स्वच्छ व प्रदूषणमुक्त करणे, वहन क्षमता वाढवून पुराचा धोका कमी करणे, संपूर्ण नदीकाठ नागरिकांच्या वापरासाठी खुला करणे, नदी पात्र वाहते ठेवणे, ऐतिहासिक वास्तू, मनोरंजन, धार्मिक, सांस्कृतिक केंद्र प्रकल्पाशी जोडणे, दोन्ही नद्यांच्या दोन्ही काठांवर 44 किलोमीटर जॉगिंग ट्रॅक सायकल ट्रॅक, नदीकाठापर्यंत जाण्यास 217 प्रवेश मार्ग, काही ठिकाणे उद्याने, 16 ठिकाणी बोटींगची सुविधा, नदीकाठांवर पूर्वीचे व नवीन असे 50 घाट असणार आहेत. या दोन्ही प्रकल्पांमुळे मुळा-मुठा नद्या सुंदर आणि प्रदूषणमुक्त होतील, त्यासाठी आवश्यक असणारा पाठपुरावा मी करीन याची काळजी देतो.”
More Stories
शिवम बालवडकर यांचे वडील मारुती किसन बालवडकर यांचे अल्पशा आजराने निधन, दशक्रिया विधी शुक्रवार दिनांक 06/12/2024 रोजी..
बाणेर येथे पुणे जिल्हा कुमार व कुमारी गट निवड चाचणी स्पर्धेत कुमार गटात प्रकाश तात्या बालवडकर क्लबने तर कुमारी गटामध्ये डॉ. पतंगराव कदम कबड्डी संघाने मिळविले विजेतेपद…
बाणेर येथील युरोकुल युरोलॉजी इन्स्टिट्यूटतर्फे ७ व ८ डिसेंबरला ‘रिकन्स्ट्रक्टीव्ह युरोलॉजी’वर आंतरराष्ट्रीय कार्यशाळा