June 5, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

कै. बाबुराव चिंधू विधाते आणि कै. संतोष बाळासाहेब विधाते यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त झाले हभप वांजळे महाराजांचे सुश्राव्य कीर्तन…

बाणेर :

बाणेर येथील विधाते परिवारातील आदर्श व्यक्तिमत्व प्रगतीशील शेतकरी कै. बाबुराव चिंधू विधाते आणि कै. संतोष बाळासाहेब विधाते यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त भागवताचार्य कीर्तन केसरी ह.भ.प. चंद्रकांत महाराज वांजळे यांचे सुश्राव्य कीर्तन आयोजित करण्यात आले होते.

एक प्रगतशील शेतकरी, विठ्ठलावर जिवापाड प्रेम करणारा वारकरी, जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या बैल जोडीचा मानकरी, कष्ट करुन उभारलेला व्यवसाय अशा अनेक बिरुदांनी नावाजले कै. बाबुराव चिंधू विधाते हे पंचक्रोशी मध्ये परिचित व्यक्तिमत्व होते. त्यांच्या आणि कै. संतोष बाळासाहेब विधाते यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त किर्तन सेवा विधाते परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आली होती.

यावेळी सामाजिक कार्यकर्त्या सौ. पुनम विशाल विधाते आणि विधाते परिवाराच्या वतीने मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या मा. मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा असल्याचा फलक आवर्जून लावण्यात आला. मराठा आरक्षण किती महत्वाचे आहे हे या पाठींबा दर्शविणाऱ्या फलक दर्शवत होता. सगळ्यांचे लक्ष वेधत होता.

यावेळी कीर्तन रुपी शब्द मार्मिक स्वरूपात उपस्थितांच्या मनावर बिंबवलेले भागवताचार्य कीर्तन केसरी ह.भ.प. चंद्रकांत महाराज वांजळे आणि जगतगुरु संत तुकाराम महाराज देवस्थान चे अध्यक्ष हभप पुरुषोत्तम महाराज मोरे यांचा सन्मान क्रेडाई चे मा. अध्यक्ष बांधकाम व्यावसायिक हेमंत नाईकनवरे आणि स्थायी समिती मा. अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

यावेळी पंचक्रोशीतील सांप्रदायिक, राजकीय, क्रीडा, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील विविध मान्यवर नातेवाईक आप्तेष्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते.