July 30, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

*’गुरू म्हणजे जीवनाला दिशा देणारा दीपस्तंभ’ – ह.भ.प. शेखर महाराज जांभुळकर यांचे पेरीविंकल सूस शाखेत गुरुपौर्णिमेनिमित्त उदगार!!*

*पेरीविंकल स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा भक्तिभाव, संस्कार आणि प्रेरणेच्या वातावरणात उत्साहात साजरी*!!

सुस :

चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, सूस येथे भारतीय संस्कृतीतील गुरुशिष्य परंपरेचा गौरव करणारा गुरुपौर्णिमा महोत्सव अत्यंत भक्तिभाव, संस्कार आणि प्रेरणादायी वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संपूर्ण विद्यालय परिसर गुरुंच्या चरणी कृतज्ञता, श्रद्धा आणि आदर व्यक्त करणाऱ्या वातावरणाने भारावून गेला होता. विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक सादरीकरणांतून आपल्या गुरुजनांप्रती असलेला सन्मान आणि प्रेम व्यक्त केले.

 

आज गुरुपौर्णिमेनिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून ह. भ. प. शेखर महाराज जांभूळकर यांना आमंत्रित केले होते. परमपूज्य जांभूळकर महाराज यांचे स्वागत पाद्यपूजन करून करण्यात आले. 

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या शुभहस्ते पारंपरिक सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध कीर्तनकार, कथाकार, ह.भ.प. शेखर महाराज जांभुळकर तर विशेष अतिथी म्हणून प्रसिद्ध उद्योजक मा. श्री. सुरेशभाऊ हुलावळे व इंडियन आयडॉल फेम प्रसिद्ध गायक श्री. सुरेश कदम तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री राजेंद्र बांदल सर, संचालिका सौ रेखा बांदल, शिवानी बांदल आणि सौ निर्मल पंडित आदी मान्यवर उपस्थित होते.

भारतीय संस्कृतीतील गुरुंचे सर्वोच्च स्थान अधोरेखित करणाऱ्या या विधींनी संपूर्ण कार्यक्रमाला आध्यात्मिक आणि संस्कारमय स्वरूप प्राप्त झाले. सर्वात आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी ऋषीमुनी चा अवतार परिधान करून खरच ऋषीमुनींच्या वेशात गुरुकुल अवतरल्यासारखे वाटले. यानंतर विद्यार्थ्यांनी प्रमुख पाहुण्यांचे गुलाबाच्या सुगंधी पाकळ्यांचा वर्षाव करून आगळ्यावेगळ्या आणि मनमोहक पद्धतीने स्वागत केले. या अनोख्या स्वागतामुळे उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

यानंतर विद्यार्थ्यांनी गुरुगीत, मनोगते, भक्तिगीते, भावपूर्ण नृत्याविष्कार, प्रेरणादायी सादरीकरणे यांद्वारे आपल्या गुरुजनांविषयीची कृतज्ञता अत्यंत प्रभावीपणे व्यक्त केली. प्रत्येक सादरीकरणातून भारतीय संस्कृतीतील गुरुशिष्य परंपरेचे महत्त्व अधोरेखित झाले.

आपल्या अत्यंत प्रभावी आणि प्रेरणादायी मार्गदर्शनात ह.भ.प. शेखर महाराज जांभुळकर यांनी संतपरंपरेचे महत्त्व, संतांचे विचार, अध्यात्म आणि आधुनिक शिक्षण यांचा सुंदर संगम उपस्थितांसमोर उलगडून सांगितला. “गुरू म्हणजे केवळ शिक्षण देणारी व्यक्ती नसून जीवनाला योग्य दिशा देणारा दीपस्तंभ आहे,” असे सांगत त्यांनी शिक्षकांचे राष्ट्रनिर्मितीतील योगदान अधोरेखित केले. काळाची गरज ओळखून विद्यार्थ्यांच्या बदलत्या गरजांनुसार स्वतःमध्ये सातत्याने सकारात्मक परिवर्तन घडविणारा शिक्षकच समाजाला सक्षम दिशा देऊ शकतो, असे त्यांनी नमूद केले. गुरुतत्त्व हे काळाच्या पलीकडचे, सर्वव्यापी आणि विश्वकल्याणाशी जोडलेले तत्त्व असल्याचे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना ज्ञानाबरोबरच संस्कार, शिस्त, प्रामाणिकपणा, पालक व गुरूजनांचा आदर आणि समाजाप्रती कर्तव्यभाव जोपासण्याचे आवाहन केले. त्यांनी 

आचार्य चाणक्य यांच्या विचारांचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, “शिक्षक ही समाजाची खरी ताकद आहे. गुरूचे स्थान सर्वोच्च, पवित्र आणि अभाधित आहे. गुरूचे ऋण कोणत्याही संपत्तीने फेडता येत नाही.” विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांचा सन्मान करत ज्ञान, संस्कार, चारित्र्य, कर्तव्यभाव, राष्ट्रप्रेम आणि सामाजिक बांधिलकी जोपासली पाहिजे. शिक्षण हे केवळ पदवी मिळविण्यासाठी नसून व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी असते, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या ओजस्वी विचारांनी सर्व उपस्थित वर्ग प्रेरित झाला.

यावेळी श्री. सुरेश कदम यांनी “भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल” हा भावपूर्ण अभंग सादर करून संपूर्ण सभागृह भक्तिरसात न्हाऊ घातले. त्यांच्या सुमधुर गायनामुळे उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद देत भक्तिमय वातावरणाचा आनंद लुटला.

कार्यक्रमात सर्व गुरुजनांचा विशेष सत्कार करण्यात आला. प्रत्येक शिक्षकाला भगवद्गीता आणि सन्मानपत्र/भेटकार्ड देऊन त्यांच्या ज्ञानदानाच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. या सन्मानामुळे भारतीय संस्कृतीतील गुरुंचे श्रेष्ठ स्थान आणि गुरुशिष्य परंपरेची महानता अधोरेखित झाली.

 

यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री. राजेंद्र बांदल यांनी आपल्या अत्यंत प्रेरणादायी मनोगतात श्रीमद्भगवद्गीतेच्या संपूर्ण अठरा अध्यायांचा अत्यंत सोप्या, सुबोध आणि जीवनाशी निगडित उदाहरणांद्वारे उलगडा केला. भगवद्गीता ही केवळ धार्मिक ग्रंथ नसून ती संपूर्ण मानवजातीसाठी जीवन जगण्याची सर्वोत्तम मार्गदर्शिका असल्याचे त्यांनी सांगितले.पहिल्या अध्यायातील कर्तव्याची जाणीव, दुसऱ्या अध्यायातील स्थितप्रज्ञतेचा संदेश, कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग, आत्मसंयम, श्रद्धा, समत्व, आत्मविश्वास, निःस्वार्थ कर्म, नेतृत्व, चारित्र्य, आत्मबळ आणि अखेरच्या अध्यायातील संपूर्ण समर्पण या प्रत्येक जीवनमूल्यांचा विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनाशी संबंध जोडत त्यांनी अत्यंत परिणामकारक विवेचन केले. विद्यार्थ्यांनी केवळ परीक्षेत यश मिळविण्यापुरते शिक्षण न घेता, जीवनात उत्तम माणूस बनण्यासाठी भगवद्गीतेतील विचार आचरणात आणणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

 

यावेळी संस्थेच्या संचालिका सौ. रेखा बांदल यांनी विद्यार्थ्यांना गुरूंच्या मार्गदर्शनातून ज्ञान, संस्कार, शिस्त, चारित्र्य आणि जीवनमूल्यांची जोपासना करून जीवनात उंच भरारी घेण्याचा प्रेरणादायी संदेश दिला.

 

भक्तिमय वातावरण, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, गुरुजनांविषयी व्यक्त झालेली कृतज्ञता, प्रेरणादायी विचार, संस्कारमय सादरीकरणे आणि भारतीय संस्कृतीचा अभिमान जागवणारे विविध उपक्रम यांमुळे संपूर्ण गुरुपौर्णिमा महोत्सव उपस्थितांच्या कायम स्मरणात राहील असा अविस्मरणीय ठरला.

 

संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन संस्थेचे अध्यक्ष श्री. राजेंद्र बांदल, संचालिका सौ. रेखा बांदल, शिवानी बांदल, शाळेच्या प्रमुख प्राचार्या सौ. निर्मल पंडित, उपमुख्याध्यापिका सौ. योगिता ढाणे, पर्यवेक्षिका सौ. नेहा माळवदे, सचिन खोडके यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आले. विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. 

कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन सौ प्रफुल्ला पाटील यांनी केले. तर संपूर्ण सजावट कला शिक्षक शिवराज कदम यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांसमवेत करण्यात आली होती.

 अखेरीस सर्वांनी सामूहिकरित्या पसायदान म्हणत विश्वकल्याणाची प्रार्थना केली आणि अत्यंत भावपूर्ण वातावरणात कार्यक्रमाची सांगता पसायदानाने अत्यंत शिस्तबद्ध आणि शांत वातावरणात करण्यात आली.