September 11, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

*पेरिविंकलमधील सुस शाखेच्या विद्यार्थ्यांच्या हातून साकारला ‘पर्यावरणपूरक गणराया’!* *शाडू माती गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेतून परंपरेसोबत दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश!!!*

सूस :

चैतन्य विद्या प्रतिष्ठान संचलित पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, सुस शाखेत इयत्ता ६ वी ते ९ वीच्या विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणपूरक शाडू मातीच्या श्री गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा व स्पर्धेचे उत्साहात आयोजन करण्यात आले. श्री भगवती सेवा आश्रम आणि जीवन कौशल्य विकास, बाणेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे हे पाचवे यशस्वी वर्ष असून, विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘शाडू मातीपासून पर्यावरणपूरक श्री गणेशमूर्ती निर्माण करणे’ या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना पारंपरिक पद्धतीने गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी शाडू मातीला आकार देत अत्यंत कल्पकतेने आणि कलात्मकतेने विविध गणेशमूर्ती साकारल्या. कच्च्या मातीपासून सुंदर मूर्ती घडविताना विद्यार्थ्यांना पारंपरिक कलेचा अनुभव तर मिळालाच, त्याचबरोबर पर्यावरणपूरक सण साजरे करण्याचे महत्त्वही समजले.

या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला, कलात्मक कौशल्याला, संयमाला, एकाग्रतेला, कल्पनाशक्तीला आणि संघभावनेला चालना मिळाली. स्वतःच्या हातांनी गणेशमूर्ती साकारण्याचा अनुभव विद्यार्थ्यांसाठी अत्यंत आनंददायी आणि संस्मरणीय ठरला.

कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांचा उत्साह, उत्सुकता आणि सहभाग विशेष लक्षवेधी होता. गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे होणारे जलप्रदूषण टाळून शाडू मातीच्या मूर्तींचा वापर करण्याचा पर्यावरणपूरक संदेश या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आला. ‘परंपरा जपूया, पर्यावरण वाचवूया’ या विचाराची रुजवणूक विद्यार्थ्यांच्या मनात करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.

या कार्यशाळेसाठी श्री भगवती सेवा आश्रमाच्या व्यवस्थापनाने आवश्यक साहित्याची उपलब्धता करून देत प्रशिक्षणाचे नियोजन व आयोजन सुरळीतपणे केले. तसेच संस्थेच्या प्रशिक्षकांनी विद्यार्थ्यांना मूर्ती निर्मितीच्या प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन केले. शाळेतील शिक्षक व मार्गदर्शकांनीही विद्यार्थ्यांना आवश्यक सहकार्य करून त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन दिले.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गिरिधर राठी, डॉ. श्याम कुलकर्णी, विकास जोशी आणि चंद्रकांत जाधव पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे कार्यशाळा शिस्तबद्ध, आनंददायी आणि विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक ठरली.

संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन व आयोजन हे पेरिविंकल इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री राजेंद्र बांदल सर, संचालिका सौ रेखा बांदल, शिवानी बांदल व प्रमुख प्राचार्या सौ निर्मल पंडित यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते.

कार्यशाळेचे नीटनेटके नियोजन व संयोजन हे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्याध्यापिका श्रीमती योगिता ढाणे कॉलेजचे विभागप्रमुख श्री. सचिन खोडके व नेहा माळवदे यांच्या सहकार्याने तसेच कलाशिक्षक शिवराज कदम व इतर सर्व शिक्षकवृंद यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापिका, उपमुख्याध्यापिका, एच.ओ.डी., शिक्षकवर्ग तसेच सर्व संबंधितांचे आयोजकांकडून आभार मानण्यात आले.

पेरिविंकल स्कूलमध्ये शाडू मातीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा उत्साहात साधत

विद्यार्थ्यांनी साधला परंपरा, कला आणि पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संगम!!

कला, संस्कृती आणि पर्यावरण संवर्धन यांचा सुरेख संगम घडवून आणणाऱ्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना केवळ गणेशमूर्ती बनविण्याचे कौशल्य मिळाले नाही, तर निसर्गाप्रती जबाबदारीची जाणीव आणि शाश्वत जीवनपद्धतीचा संदेशही मिळाला. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने आणि आनंदी वातावरणात कार्यशाळेची सांगता झाली.