September 13, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

*कारगिलचे शौर्य, राष्ट्रभक्तीचा जागर – पेरिविंकल विद्यालयातील बावधन शाखेत विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व्याख्यान*

बावधन :

चैतन्य विद्या प्रतिष्ठान संचलित पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, बावधन येथे भारत विकास परिषद यांच्या सहकार्याने कारगिल विजय दिवस अत्यंत उत्साहपूर्ण, देशभक्तीपूर्ण आणि भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाला मा. श्री. सुहास फडके हे प्रमुख पाहुणे, तर श्री. उकिडवे सर हे मान्यवर पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. राजेंद्र बांदल, संचालिका सौ. रेखा बांदल आणि संचालिका कु. शिवानी बांदल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात कारगिल युद्धातील अमर वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली. उपस्थित सर्वांनी भारतमातेच्या शूर वीरांच्या अतुलनीय शौर्य, धैर्य, त्याग आणि बलिदानाला विनम्र अभिवादन केले.

यानंतर संचालिका सौ. रेखा बांदल यांनी मान्यवरांचे स्वागत व सत्कार केला. आपल्या मनोगतात त्यांनी प्रमुख पाहुण्यांच्या कार्याचे कौतुक करत विद्यार्थ्यांना राष्ट्रप्रेम, देशसेवा, शिस्त, प्रामाणिकपणा आणि सैनिकांच्या धैर्य, शौर्य व कर्तव्यनिष्ठेचा आदर्श जीवनात अंगीकारण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी जीवनात निश्चित ध्येय ठरवून ते जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या बळावर पूर्ण करावे, असा प्रेरणादायी संदेश शाळेच्या संचालिका सौ रेखा बांदल यांनी त्यांच्या भाषणातून सर्व विद्यार्थ्यांना दिला.

कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले ते मा. श्री. सुहास फडके यांचे प्रेरणादायी व्याख्यान. व्याख्यानाची सुरुवात त्यांनी “मी तुमच्या समोर सादर करतोय कारगिल विजयाची विजयगाथा…” या शब्दांनी केली आणि त्यानंतर कारगिल युद्धातील प्रत्येक प्रसंग विद्यार्थ्यांसमोर इतक्या जिवंतपणे उभा केला की, उपस्थित प्रत्येकाला जणू त्या रणभूमीवरच उभे असल्याचा अनुभव आला. भारतीय सैनिकांचे अतुलनीय धैर्य, अद्वितीय शौर्य, संघर्ष, त्याग आणि राष्ट्रासाठीचे सर्वोच्च बलिदान त्यांनी अत्यंत प्रभावी शैलीत उलगडून सांगितले. त्यांच्या ओघवत्या कथनामुळे विद्यार्थ्यांनी कारगिल युद्ध केवळ ऐकले नाही, तर ते अक्षरशः अनुभवले. त्यांच्या शब्दांनी विद्यार्थ्यांना जणू त्या काळातच घेऊन गेले आणि कारगिलच्या प्रत्येक क्षणाची अनुभूती दिली. संपूर्ण सभागृह देशभक्तीच्या भावनेने भारावून गेले आणि अनेक विद्यार्थ्यांच्या अंगावर अक्षरशः शहारे आले.

आपल्या व्याख्यानाच्या समारोपावेळी त्यांनी “मैं रहूँ या ना रहूँ, देश रहना चाहिए…” हे हृदयस्पर्शी देशभक्तीपर गीत सादर केले. या गीताने उपस्थित प्रत्येकाच्या मनात देशाविषयीचा अभिमान, सैनिकांविषयीची कृतज्ञता आणि राष्ट्रभक्तीची भावना अधिक दृढ झाली.

यानंतर विद्यार्थ्यांनी “ऐ मेरे वतन के लोगो…” या अमर देशभक्तीपर गीताच्या पार्श्वभूमीवर भारतमातेच्या वीर जवानांना मानवंदना देत सलामी अर्पण केली. विद्यार्थ्यांच्या या भावपूर्ण सादरीकरणाने उपस्थित सर्वांचे मन हेलावून गेले आणि संपूर्ण परिसर राष्ट्रभक्तीच्या भावनेने भारावून गेला.

यावेळी मा. श्री. सुहास फडके यांनी विद्यार्थ्यांना भारतीय सैनिकांच्या शौर्य, धैर्य आणि त्यागातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. देशाचे रक्षण करणाऱ्या प्रत्येक जवानाचा सन्मान करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य असल्याचे सांगत त्यांनी राष्ट्रप्रेम, कृतज्ञता आणि देशसेवेची भावना प्रत्येकाच्या मनात सदैव जागृत ठेवण्याचा संदेश दिला.

कार्यक्रमाची सांगता सर्व उपस्थितांनी एकसुरात “वंदे मातरम्” गायन करून केली. देशभक्ती, शौर्य, धैर्य आणि राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा देणारा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या मनावर कायमस्वरूपी ठसा उमटवून गेला.

या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन हे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री राजेंद्र बांदल सर, संचालिका सौ रेखा बांदल, शिवानी बांदल यांच्या अध्यक्षतेखाली मुख्याध्यापक व पर्यवेक्षिका सायली गायकवाड व शिरीन काझी यांच्या नेतृत्वाने इव्हेंट हेड वृषाली ब्रम्हे व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले होते.

 

You may have missed