पुणे, २५ जुलै २०२६ :
महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) ने पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (पीएमसी व पीसीएमसी) परिसरात १३१ सीएनजी स्टेशनचे मजबूत जाळे उभारले असून, या माध्यमातून ६ लाखांहून अधिक सीएनजी वाहनांना सेवा पुरवली जात आहे. सध्या दररोज १४.० लाख स्टँडर्ड क्यूबिक मीटर (SCMD) पेक्षा अधिक सीएनजीचा वापर वरील भागात होत आहे.
सध्या पुणे आणि पीसीएमसी परिसराला चिखली आणि तळेगाव येथील सिटी गेट स्टेशन (CGS) मार्फत नैसर्गिक वायूचा पुरवठा केला जातो. हा पुरवठा प्रामुख्याने गेल (GAIL) च्या दहेज-उरण-दाभोळ-पनवेल (DUPL-DPPL) नैसर्गिक वायू पाइपलाइन नेटवर्कमधून केला जातो. सीएनजीचा वापर सातत्याने वाढत असल्यामुळे कधी कधी पीक डिमांडच्या वेळी CNG पुरवठ्यावर काही प्रमाणात ताण येतो. ही बाब लक्षात घेऊन एमएनजीएल ग्राहकांना अखंड आणि विश्वासार्ह गॅसपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी, गॅस वितरण पायाभूत सुविधा अधिक सक्षम करत आहे. याच अनुषंगाने, तळेगाव परिसरातील पाइपलाइन लूपिंगचे काम अंतिम टप्प्यात असून, त्यामुळे नेटवर्कची क्षमता आणि कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ होणार आहे.
याशिवाय, एमएनजीएलने पीआयएल (PIL) च्या ईस्ट-वेस्ट पाइपलाइन (EWPL) मधून पर्यायी नैसर्गिक वायू पुरवठा जोडण्याचे काम सुरू केले आहे. या प्रकल्पांतर्गत नव्हारे येथून एमएनजीएलच्या पुणे भौगोलिक क्षेत्रापर्यंत (GA) सुमारे ६० किमी लांबीची स्टील ट्रंक पाइपलाइन (STPL) टाकली जात आहे. यामुळे पुणे शहराला नैसर्गिक वायूचा अतिरिक्त आणि विश्वासार्ह स्रोत उपलब्ध होईल तसेच संपूर्ण वितरण व्यवस्था अधिक सक्षम होईल. याशिवाय, दिघी परिसरात आणखी एक पाइपलाइन लूपिंग प्रकल्पही सुरू करण्यात आला आहे.
हे सर्व प्रकल्प पुणे आणि पीसीएमसी परिसरासाठी दीर्घकालीन आणि भक्कम पुरवठा सुरक्षिततेचे उपाय आहेत. एमएनजीएलच्या सीएनजी डीलर्सना या पायाभूत सुविधा विकासाबाबत आणि पुरवठा मजबूत करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची नियमित माहिती MNGL कडून देण्यात येत आहे.
पावसाळ्यात प्रवासी दुचाकीऐवजी चारचाकी वाहनांना प्राधान्य देत असल्यामुळे सीएनजीची मागणी तात्पुरती वाढते. वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी एमएनजीएलने गेल्या वर्षभरात पुणे आणि पीसीएमसी परिसरात ११ नवीन सीएनजी स्थानके सुरू केली असून त्यामुळे सीएनजी कॉम्प्रेशन आणि वितरण क्षमता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याशिवाय, चालू आर्थिक वर्षात आणखी ९ नवीन रिटेल आऊटलेट्स (ROs) सुरू करण्याचे नियोजन आहे. यामुळे ग्राहकांना अधिक सुलभ सेवा, वाढीव वितरण क्षमता आणि प्रतीक्षा वेळेत घट होईल.
ग्राहकाभिमुख उपक्रमांतर्गत, जास्त मागणी असलेल्या रिटेल आऊटलेट्सवर १७ अतिरिक्त सीएनजी डिस्पेन्सर्स बसविण्यात आले असून त्यामुळे गर्दीच्या वेळेत रांगा कमी होऊन वाहनांना जलद सेवा मिळत आहे. तसेच, आणखी ८ नवीन डिस्पेन्सर्स बसविण्याची योजना आहे.
एमएनजीएल दररोज १,२०० हून अधिक पीएमपीएमएलच्या सीएनजी बसांना इंधन पुरवत असून, पुण्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला महत्त्वपूर्ण आधार देत आहे. एमएनजीएलच्या विश्वासार्ह पुरवठ्यामुळे आणि दर्जेदार सेवेमुळे पीएमपीएमएलने आपल्या सीएनजी बस ताफ्यात आणखी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
वाढत्या सीएनजी ग्राहकवर्गाला सेवा देण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या एमएनजीएल तसेच ऑइल मार्केटिंग कंपन्यांच्या (OMCs) सर्व सीएनजी डीलर्स आणि MNGL च्या चॅनेल पार्टनर्सचे एमएनजीएल मनःपूर्वक आभार मानते. पर्यायी आणि अतिरिक्त गॅस पुरवठा, मजबूत पायाभूत सुविधा आणि अधिक सुरक्षित पुरवठा व्यवस्था यामुळे आगामी काळात वाढत्या मागणीचा लाभ घेऊन सर्व डीलर्स आणि भागीदारांना सीएनजी विक्रीत मोठी वाढ साध्य करता येईल.
एमएनजीएल पुणे परिसरातील सीएनजी पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी, ग्राहकांना अधिक सुलभ आणि सोयीस्कर सेवा देण्यासाठी आणि संपूर्ण सीएनजी परिसंस्था मजबूत करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. स्वच्छ इंधनाचा पुरवठादार म्हणून एमएनजीएल पुणेकरांच्या जीवनाला ऊर्जा देत असून पर्यावरणपूरक आणि शाश्वत भविष्यासाठीही महत्त्वपूर्ण योगदान देत आहे.
सीएनजीव्यतिरिक्त, एमएनजीएल सध्या पुणे आणि पीसीएमसी परिसरातील ८.५० लाखांहून अधिक घरांमध्ये तसेच १,००० पेक्षा अधिक औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांसाठी पाइप्ड नॅचरल गॅस (PNG) पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत आहे. यासाठी कंपनीने २,७०० किमीहून अधिक लांबीचे मजबूत पाइपलाइन नेटवर्क उभारले आहे. सध्या ४.५५ लाखांहून अधिक घरांमध्ये पीएनजीचा प्रत्यक्ष वापर सुरू आहे. या यशाच्या आधारावर घरगुती क्षेत्रात पीएनजीचा अधिक व्यापक विस्तार करण्यासाठी एमएनजीएलने वेगवान पायाभूत सुविधा विस्तार कार्यक्रम हाती घेतला आहे.
मागणीत झालेल्या अलीकडील वाढीपूर्वी एमएनजीएल दररोज सुमारे १८० ते १९० घरांना पीएनजी जोडणी देत होती, म्हणजेच दरमहा सुमारे ६,००० जोडण्या दिल्या जात होत्या. आज कंपनी दररोज सुमारे ५०० नवीन पीएनजी जोडण्या, म्हणजेच दरमहा जवळपास १५,००० जोडण्या देत असून, ही क्षमता सुमारे २५० टक्क्यांनी वाढली आहे.
भविष्यातील वाढती मागणी लक्षात घेऊन एमएनजीएल कंत्राटदारांची संख्या वाढविणे, अतिरिक्त तांत्रिक पथके नियुक्त करणे आणि कुशल मनुष्यबळ वाढविणे यांसारख्या उपाययोजनांद्वारे आपल्या अंमलबजावणी क्षमतेत मोठी वाढ करत आहे. याशिवाय, पाइपलाइन टाकणे, मीटर बसविणे, कमिशनिंग आणि इतर विशेष सिटी गॅस डिस्ट्रिब्युशन (CGD) कामांसाठी प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्यासाठी कंपनी तांत्रिक संस्था आणि प्रशिक्षण केंद्रांशीही सहकार्य करत आहे. या सर्व उपक्रमांमुळे एमएनजीएलला भविष्यात दररोज ८०० हून अधिक पीएनजी जोडण्या देण्याची क्षमता प्राप्त होईल, असा कंपनीला विश्वास आहे.















More Stories
स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त औंधमध्ये वृक्षारोपण
योगीराज पतसंस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष गौरव सोहळा संपन्न….
*कारगिलचे शौर्य, राष्ट्रभक्तीचा जागर – पेरिविंकल विद्यालयातील बावधन शाखेत विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व्याख्यान*