July 26, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

*कारगिलच्या वीर जवानांच्या शौर्याला पेरीविंकल सूस शाखेतील विद्यार्थ्यांची भावपूर्ण मानवंदना!*

सुस :

चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, सूस येथे कारगिल विजय दिन देशभक्तीपूर्ण आणि भावनिक वातावरणात साजरा करण्यात आला. इयत्ता सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत भारतीय जवानांच्या शौर्याला अनोखी मानवंदना दिली.

 

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या स्वागताने व मेणबत्ती प्रज्वलन करून करण्यात आली. त्यानंतर कारगिल विजय दिनाचे ऐतिहासिक महत्त्व विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. देशाच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शहीद जवानांना पुष्पांजली अर्पण करून त्यांच्या अतुलनीय शौर्य, त्याग आणि राष्ट्रनिष्ठेला भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.

यावेळी विद्यार्थी अद्वैत सोनवणे, स्वरूप आडसुळ आणि श्रेया तवले यांनी कारगिल युद्धातील भारतीय सैनिकांच्या पराक्रमावर प्रभावी आणि ओजस्वी भाषणे सादर केली. त्यांच्या भाषणातून भारतीय जवानांचे धैर्य, त्याग आणि देशप्रेम प्रभावीपणे विद्यार्थ्यांसमोर उलगडले. तसेच कारगिल विजय दिनाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आधारित माहितीपट दाखविण्यात आला. या माध्यमातून विद्यार्थ्यांना कारगिल युद्धातील भारतीय सैनिकांच्या शौर्याची आणि ‘ऑपरेशन विजय’च्या ऐतिहासिक यशाची माहिती मिळाली.

यानंतर शाळेच्या संचालिका शिवानी बांदल यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. देशप्रेम, राष्ट्रनिष्ठा, शिस्त, कर्तव्यनिष्ठा आणि देशासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांच्या त्यागाचे महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.

तसेच यावेळी शाळेच्या संचालिका सौ रेखा बांदल यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना सांगितले की,“कारगिल विजय दिन हा केवळ विजयाचा उत्सव नसून, देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीर जवानांच्या शौर्य, त्याग आणि राष्ट्रप्रेमाला कृतज्ञतेने वंदन करण्याचा दिवस आहे. त्यांच्या बलिदानातून देशभक्ती, शिस्त, कर्तव्यनिष्ठा आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा घेऊन प्रत्येक विद्यार्थ्याने जबाबदार, सजग आणि संवेदनशील नागरिक बनण्याचा संकल्प करावा, हाच या कार्यक्रमाचा खरा संदेश आहे.”

कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन सौ. अनुराधा यादव यांनी केले.

कार्यक्रमाची सांगता ‘ऐ मेरे वतन के लोगो… जरा आँख में भर लो पानी’ या अत्यंत भावस्पर्शी देशभक्तीपर गीताने करण्यात आली. या गीताच्या सादरीकरणादरम्यान विद्यार्थ्यांनी वीर शहीद जवानांना भावपूर्ण सलामी देत त्यांच्या शौर्य, त्याग आणि बलिदानाला आदरांजली अर्पण केली. या भावनिक क्षणामुळे संपूर्ण वातावरण भारावून गेले आणि उपस्थितांच्या मनात देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या वीर जवानांविषयी कृतज्ञता व आदराची भावना अधिक दृढ झाली.

संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. राजेंद्र बांदल, संचालिका सौ. रेखा बांदल व शिवानी बांदल यांच्या अध्यक्षतेखाली मुख्याध्यापिका तसेच उपमुख्याध्यापिका सौ. योगिता ढाणे, पर्यवेक्षिका सौ. नेहा माळवदे तसेच H.O.D. श्री. सचिन खोडके यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या व अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न झाला. कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शनाने करण्यात आला.

या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्तीची भावना अधिक दृढ झाली तसेच देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वीर जवानांविषयी आदर, कृतज्ञता आणि अभिमानाची भावना निर्माण झाली.