July 25, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

*‘माऊली… माऊली…’च्या गजरात भक्तीचा जल्लोष; ‘पेरीविंकलची वारी’ने दुमदुमली बावधन नगरी!*

*पेरीविंकल बावधनमध्ये चिमुकल्यांसाठी साकारला ‘वारीचा रस्ता’; विद्यार्थ्यांनी घेतला पंढरीच्या वारीचा अनोखा अनुभव!*

बावधन :

आषाढी एकादशीच्या निमित्ताने चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, बावधन शाखेत भक्ती, उत्साह आणि संस्कृतीचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला. ‘माऊली… माऊली…’, ‘ज्ञानोबा-तुकाराम’ आणि ‘विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल’ या जयघोषांनी शाळेचा परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनातील अत्यंत महत्त्वाचा उत्सव असलेल्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना वारकरी परंपरेचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा आणि संतपरंपरेतील संस्कार त्यांच्या मनावर रुजावेत, या उद्देशाने ‘पेरीविंकलची वारी’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

 

सकाळपासूनच शाळेच्या परिसरात उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण होते. पारंपरिक वेशभूषेतील विद्यार्थी, हातात भगव्या पताका, टाळ-मृदंगाचा गजर आणि भक्तिगीतांच्या तालावर उमटणारा उत्साह यामुळे बावधन परिसरात जणू ‘छोटी पंढरी’च अवतरली होती. या उपक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांसाठी शाळेच्या परिसरात साकारण्यात आलेला विशेष ‘वारीचा रस्ता’. पंढरपूरच्या वारीचा अनुभव विद्यार्थ्यांना शाळेच्या आवारातच घेता यावा, या अभिनव संकल्पनेतून हा मार्ग आकर्षक पद्धतीने तयार करण्यात आला होता. या ‘वारीच्या रस्त्यावरून’ विद्यार्थ्यांनी उत्साहाने पालखी सोहळ्यात सहभाग घेतला. भगव्या पताका, वारकरी परंपरेची सजावट, भक्तिगीते, अभंग आणि ‘माऊली-माऊली’च्या जयघोषाने हा मार्ग जणू पंढरीच्या वारीचेच सुंदर प्रतिरूप बनला होता.

विशेषतः चिमुकल्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत वारीचा अनुभव घेतला. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, उत्साह आणि भक्तिभाव हा कार्यक्रमाचा विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत वारकरी परंपरेचे मनोहारी दर्शन घडविले. पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा भक्तिभाव आणि उत्साह लक्षवेधी ठरला. टाळ-मृदंगाच्या तालावर आणि अभंगांच्या सुरांवर संपूर्ण वातावरण भारावून गेले. ‘पेरीविंकलची वारी’ हा विद्यार्थ्यांसाठी केवळ एक सांस्कृतिक कार्यक्रम न राहता, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाशी जोडणारा एक सुंदर अनुभव ठरला. पुस्तकातून शिकलेली वारकरी परंपरा विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कृतीतून अनुभवली.

कार्यक्रमादरम्यान विठ्ठल-रुक्मिणी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. आषाढी एकादशीचे महत्त्व, वारकरी संप्रदायाची परंपरा आणि संतांच्या शिकवणीचा विद्यार्थ्यांना परिचय करून देण्यात आला. विद्यार्थ्यांनी सादर केलेली भक्तिगीते, अभंग आणि सांस्कृतिक सादरीकरणांनी कार्यक्रमाला विशेष रंगत आणली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या विचारांची ओळख करून देण्यात आली. प्रेम, समता, सेवा, सहकार्य आणि मानवता ही संतपरंपरेची मूल्ये आपल्या जीवनात आचरणात आणण्याचा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला. विद्यार्थ्यांना आपल्या महाराष्ट्राच्या समृद्ध वारकरी परंपरेचा अभिमान वाटावा आणि भारतीय संस्कृतीशी त्यांचे नाते अधिक दृढ व्हावे, यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले.

 

या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे पसंस्थापक अध्यक्ष माननीय श्री. राजेंद्र बांदल सर, संचालिका सौ. रेखा बांदल आणि शिवानी बांदल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या नियोजनात आणि प्रभावी अंमलबजावणीत पर्यवेक्षिका सौ. सायली गायकवाड आणि सौ. शिरीन काझी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. तसेच इव्हेंट हेड सौ. वृषाली ब्रम्हे यांच्या संकल्पना, नियोजन आणि उत्कृष्ट समन्वयामुळे कार्यक्रमाला आकर्षक आणि उत्साहपूर्ण स्वरूप प्राप्त झाले. शाळेच्या

 विभागप्रमुख, समन्वयक आणि शिक्षकवृंद यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीपणे अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न झाला.

 

 शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने आणि मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.

आषाढी एकादशीच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमातून ‘शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर संस्कार, संस्कृती आणि अनुभव यांचा सुंदर संगम’ हा पेरीविंकल स्कूलचा शैक्षणिक दृष्टिकोन अधोरेखित झाला. भक्तीचा उत्साह, वारकरी परंपरेची ओळख आणि संस्कारांची शिदोरी देणारी ही आगळीवेगळी ‘पेरीविंकलची वारी’ विद्यार्थ्यांच्या आणि उपस्थितांच्या कायम स्मरणात राहणारी ठरेल असे उदगार संस्थेच्या संचालिका सौ रेखा बांदल यांनी त्यांच्या भाषणात सांगितले. 

‘माऊली… माऊली…’च्या गजरात, टाळ-मृदंगाच्या निनादात आणि ‘विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल’च्या जयघोषात बावधन नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली.