July 1, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

पिरंगुट शाखेच्या पेरिविंकल स्कूलमध्ये राष्ट्रीय डॉक्टर दिन उत्साहात साजरा

पिरंगुट :

पेरिविंकल स्कूलमध्ये राष्ट्रीय डॉक्टर दिन अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. चेला बुरे उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मा. बांदल सर उपस्थित होते. तसेच व्यवस्थापकीय संचालिका कु. शिवानी बांदल मॅडम, संचालिका सौ. रेखा बांदल मुख्याध्यापिका सौ. इनायत मुजावर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व डॉक्टरांच्या कार्याला अभिवादन करून झाली. इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी डॉक्टर दिनाचे महत्त्व, समाजातील डॉक्टरांचे अनमोल योगदान, आरोग्यसेवेतील त्यांचे समर्पण तसेच मानवतेच्या सेवेसाठी त्यांनी दिलेले अतुलनीय योगदान याविषयी प्रभावी माहिती सादर केली. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाने उपस्थितांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण झाली.

पूर्वप्राथमिक विभागातील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी डॉक्टरांच्या वेशभूषेत सहभाग घेत आकर्षक सादरीकरण केले. तसेच “थँक यू डॉक्टर” संदेश, शुभेच्छापत्रे, रंगभरण आणि विविध सर्जनशील उपक्रमांद्वारे डॉक्टरांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. त्यांच्या निरागस सादरीकरणाने कार्यक्रमात विशेष रंगत आणली.

प्रमुख अतिथी डॉ. चेला बुरे यांनी विद्यार्थ्यांना निरोगी जीवनशैली, नियमित आरोग्य तपासणी, स्वच्छता आणि समाजसेवेचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रातील संधी व सेवाभावाची प्रेरणा दिली.

यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. बांदल सर, संचालिका कु. शिवानी बांदल , सौ. रेखा बांदल प्रमुख प्राचार्या सौ. पंडित यांनी आपल्या मनोगतातून डॉक्टरांच्या निःस्वार्थ सेवेला सलाम करत सर्व वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांना राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी समाजाप्रती जबाबदारीची भावना जोपासून निरोगी भारताच्या निर्मितीत योगदान द्यावे, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला.

संपूर्ण कार्यक्रम हा प्रमुख प्राचार्या सौ निर्मल पंडित यांच्या अध्यक्षतेखाली पिरंगुट शाखेच्या मुख्याध्यापिका इनायत मुजावर यांच्या प्रभावी नेतृत्वाने पर्यवेक्षिका सना इनामदार, पल्लवी नारखेडे व रुपाली गर्ग यांच्या सहकार्याने सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मदतीने अत्यंत शिस्तबद्ध, प्रेरणादायी आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. उपस्थित सर्वांनी डॉक्टरांच्या सेवाभावी कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांना मनःपूर्वक अभिवादन केले.