August 24, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

*हरियाणातील पानिपत येथे पार पडलेल्या कझाक कुरेश नॅशनल चॅम्पियनशिप २०२६ मध्ये कांस्यपदक पेरिविंकलच्या विद्यार्थ्याची राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी!!*

*पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, बावधनच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा!!*

बावधन :

 

चैतन्य विद्या प्रतिष्ठान संचलित पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, बावधन येथील *इयत्ता ११ वीचा विद्यार्थी रुद्र जगदीश लांडगे याने हरियाणातील पानिपत येथे पार पडलेल्या कझाक कुरेश नॅशनल चॅम्पियनशिप २०२६ मध्ये दमदार कामगिरी करत तृतीय क्रमांक पटकावत कांस्यपद मिळवले आहे.* या दैदिप्यमान यशामुळे पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, बावधनच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, संस्थेचा, पालकांचा आणि संपूर्ण परिसराचा अभिमान उंचावला आहे.

रुद्र हा पौड गावचे माजी सरपंच श्री. जगदीश लांडगे यांचा सुपुत्र असून, लहानपणापासूनच कुस्ती खेळाची आवड जोपासत त्याने अथक परिश्रम, नियमित सराव आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर हे उल्लेखनीय यश संपादन केले आहे. अभ्यासाबरोबरच क्रीडा क्षेत्रातही उत्कृष्ट कामगिरी करून त्याने विद्यार्थ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे.

कझाक कुरेश ही आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त पारंपरिक कुस्ती स्पर्धा असून देशभरातील विविध राज्यांमधील नामांकित खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. अशा कठीण आणि चुरशीच्या स्पर्धेत रुद्रने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत राष्ट्रीय स्तरावर तृतीय क्रमांक मिळवत कांस्यपदक पटकावले, ही बाब संपूर्ण पेरिविंकल परिवारासाठी अत्यंत अभिमानाची आहे.

पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, बावधन येथे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसोबतच क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक आणि व्यक्तिमत्त्व विकासावर विशेष भर दिला जातो. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना व क्रीडा कौशल्याला योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी संस्था सातत्याने प्रयत्नशील असून, त्याचाच परिणाम म्हणून संस्थेचे विद्यार्थी विविध क्षेत्रांत राज्य व राष्ट्रीय स्तरावर यशाची पताका फडकवत आहेत.

*रुद्रच्या या अभिमानास्पद यशाबद्दल चैतन्य विद्या प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. राजेंद्र बांदल, संचालिका सौ. रेखा बांदल, संचालिका कु. शिवानी बांदल तसेच पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, बावधनच्या प्राचार्या सौ. निर्मल पंडित यांनी त्याचे मनःपूर्वक अभिनंदन केले.* भविष्यात राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करून आणखी मोठे यश संपादन करावे, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.

यावेळी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालकांनीही रुद्रवर अभिनंदनाचा वर्षाव केला. त्याच्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही क्रीडा क्षेत्रात प्रगती करण्याची प्रेरणा मिळाली असून, संस्थेच्या सर्वांगीण शिक्षणाच्या ध्येयाला आणखी बळ मिळाले आहे.

राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतील रुद्र लांडगेच्या या उल्लेखनीय यशामुळे पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, बावधनच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, संस्थेच्या क्रीडा क्षेत्रातील यशस्वी वाटचालीत आणखी एका सुवर्णपानाची भर पडली आहे. भविष्यातही अशाच प्रकारे संस्थेचे विद्यार्थी विविध क्षेत्रांत उत्तुंग यश संपादन करून शाळेचे, पालकांचे आणि देशाचे नाव उज्ज्वल करतील, असा विश्वास यानिमित्ताने व्यक्त करण्यात आला.