July 1, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

*बावधन येथील पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये राष्ट्रीय डॉक्टर दिन उत्साहात साजरा!!*

बावधन, दि. १ जुलै २०२६ :

चैतन्य विद्या प्रतिष्ठान संचलित पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, बावधन येथे राष्ट्रीय डॉक्टर दिन उत्साहात व कृतज्ञतेच्या भावनेने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. राजेंद्र बांदल, संचालिका सौ. रेखा बांदल व कु. शिवानी बांदल, प्राचार्या सौ. निर्मल पंडित, तसेच प्रमुख पाहुणे डॉ. श्री व सौ. दंडगव्हाळ यांची प्रमुख उपस्थिती लाभली. 

कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या स्वागताने झाली. त्यानंतर सरस्वती पूजन करून ज्ञानदेवतेचे स्मरण करण्यात आले.

यानंतर विद्यार्थिनी काव्या मोकाशी हिने डॉक्टर दिनाचे महत्त्व विशद करणारे प्रभावी मनोगत सादर केले. डॉक्टरांचे समाजाप्रती असलेले समर्पण, त्याग आणि निस्वार्थ सेवा याबद्दल तिने कृतज्ञता व्यक्त केली.

कार्यक्रमातील विशेष आकर्षण ठरले ते विद्यार्थ्यांनी सादर केलेले नाट्य सादरीकरण. या नाटकातून डॉक्टरांचे आपल्या जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व, त्यांची निस्वार्थ सेवा, रुग्णांप्रती असलेली संवेदनशीलता आणि मानवतेची भावना प्रभावीपणे उलगडण्यात आली. विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट अभिनयाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.

डॉक्टर दिनानिमित्त इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी दंत तपासणी व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य शिबिरात डॉ. मृणाल गोडसे यांच्या टीमने, डॉ. गौरव जाधव, प्रशासकीय समन्वयक विद्या राऊत, तसेच डॉ. अश्विनी महाजन यांच्या टीमने विद्यार्थ्यांची दंत व नेत्र तपासणी केली. या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी किर्ती येरवडेकर यांनी कॅम्प समन्वयक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली. विद्यार्थ्यांना दंत व नेत्र आरोग्याविषयी आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले तसेच नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्वही समजावून सांगण्यात आले.

यानंतर प्राचार्या सौ. निर्मल पंडित यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करत डॉक्टरांनी दिलेल्या आरोग्यविषयक सल्ल्याचे व मार्गदर्शनाचे प्रामाणिकपणे पालन करण्याचे आवाहन केले. निरोगी जीवनशैली, नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करून घेण्याचे महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले.

प्रमुख पाहुणे डॉ. दंडगव्हाळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्य या तिन्ही पैलूंचे महत्त्व अधोरेखित केले. जीवनात यशस्वी होण्यासाठी सातत्य, संयम आणि योग्य स्वभाव (Temperament) आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आजची पिढी जैविक घड्याळाचे पालन (Biological Clock) करत नसल्यामुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम स्पष्ट करून नियमित दिनचर्या, पुरेशी झोप, संतुलित आहार आणि व्यायामाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. राजेंद्र बांदल, संचालिका सौ. रेखा बांदल व कु. शिवानी बांदल, प्राचार्या सौ. निर्मल पंडित यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. संपूर्ण कार्यक्रम शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित यांच्या अध्यक्षतेखाली व कुशल मार्गदर्शनाने उपप्राचार्या सौ. काकोली घोष, पर्यवेक्षिका सायली गायकवाड, शिरीन काझी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले.

डॉक्टरांच्या समाजाप्रती असलेल्या अमूल्य योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे, नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व पटवून देणे आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा आणि आरोग्याविषयी सजग करणारा हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी व संस्मरणीय ठरला.