सुस १ जुलै २०२६ :
चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, सुस शाखेत राष्ट्रीय डॉक्टर्स डे आणि चार्टर्ड अकाउंटंट्स डे मोठ्या उत्साहात, कृतज्ञतेच्या भावनेने आणि सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे तसेच डॉक्टर आणि सी.ए. या व्यवसायांबद्दल आदर निर्माण करून त्यांना करिअरची प्रेरणा देणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.
यावर्षीच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून सुस परिसरातील सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. स्नेहा राऊत उपस्थित होत्या.
तसेच जीवन हॉस्पिटल मधून डॉ. प्रियंका तिवारी (दंतचिकित्सक) आणि सूस हॉस्पिटल मधून डॉ. निकिता जयभाय(जनरल फिजिशियन) यांची विशेष उपस्थिती लाभली. प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. निर्मल पंडित यांच्या हस्ते सर्व मान्यवर डॉक्टरांचा शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन, धन्वंतरी पूजन आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर उपस्थित डॉक्टरांचा सन्मान करून त्यांच्या समाजाप्रती असलेल्या निस्वार्थ सेवेसाठी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
या निमित्ताने पूर्वप्राथमिक ते इयत्ता बारावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी मोफत दंत तपासणी तसेच मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी डॉक्टरांच्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणारे नृत्य, गीत आणि मनोगते सादर केली. “तेरी मिट्टी में मिल जावा” या गीतावर सादर झालेल्या भावपूर्ण सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. डॉक्टर हे समाजातील खरे जीवनदाते असून त्यांच्या कार्यामुळे समाज निरोगी राहतो, हा संदेश विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे मांडला.
तसेच इयत्ता ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी “डॉक्टर आणि चार्टर्ड अकाउंटंट (C.A.) कसे बनावे?” या विषयावर विशेष माहितीपट (Documentary Film) प्रदर्शित करण्यात आला. या माहितीपटाद्वारे वैद्यकीय व चार्टर्ड अकाउंटन्सी क्षेत्रातील शैक्षणिक पात्रता, प्रवेश परीक्षा, आवश्यक कौशल्ये, करिअरच्या विविध संधी आणि यशस्वी वाटचालीविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
यानंतर प्रमुख पाहुण्या डॉ. स्नेहा राऊत, डॉ. प्रियंका आणि डॉ. निकिता यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत डॉक्टर होण्यासाठी आवश्यक असलेले समर्पण, परिश्रम आणि सेवाभाव याविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्यास, सातत्यपूर्ण अभ्यास करण्यास आणि समाजहिताची भावना जपून यशस्वी करिअर घडविण्यास प्रेरित केले. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी, “आज या शाळेत बसलेल्या विद्यार्थ्यांमधूनच उद्याचे यशस्वी डॉक्टर आणि चार्टर्ड अकाउंटंट घडतील,” असा विश्वास व्यक्त केला.
संस्थेच्या संचालिका शिवानी बांदल यांनी डॉक्टरांच्या निस्वार्थ सेवेला मानवतेची सर्वोच्च सेवा असे संबोधून त्यांच्या कार्याचा गौरव केला.
प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. निर्मल पंडित यांनी आपल्या मनोगतात “Health is Wealth” या विचाराचे महत्त्व अधोरेखित करत निरोगी जीवनशैली, सात्विक आहार, नियमित व्यायाम आणि शिस्तबद्ध जीवन यांचा स्वीकार करण्याचे आवाहन केले. आजचे विद्यार्थी उद्याचे सक्षम डॉक्टर, चार्टर्ड अकाउंटंट आणि जबाबदार नागरिक बनून समाजाची सेवा करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल सर, संचालिका रेखा बांदल , शिवानी बांदल यांच्या प्रेरणेने मुख्याध्यापिका सौ. निर्मल पंडित यांच्या अध्यक्षतेखाली व कुशल मार्गदर्शनाने हा कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उपमुख्याध्यापक योगिता ढाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षक नेहा माळवदे आणि सचिन खोडके सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी आणि स्वयंसेवक यांच्या मदतीने संपूर्ण कार्यक्रम अत्यंत उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न झाला.
आरोग्याविषयी जागरूकता, डॉक्टरांप्रती कृतज्ञता आणि विद्यार्थ्यांना उज्ज्वल करिअरची प्रेरणा देणारा हा उपक्रम उपस्थितांच्या कायम स्मरणात राहील, अशा भावना सर्वांनी व्यक्त केल्या.



More Stories
पिरंगुट शाखेच्या पेरिविंकल स्कूलमध्ये राष्ट्रीय डॉक्टर दिन उत्साहात साजरा
*बावधन येथील पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये राष्ट्रीय डॉक्टर दिन उत्साहात साजरा!!*
पेरीविंकल पौड शाखेत जागतिक डॉक्टर दिन उत्साहात साजरा झाला.