November 10, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाबुरावजी घोलप महाविद्यालयाच्या खेळाडूंची दमदार कामगिरी — एथलेटिक्स स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा चॅम्पियनशिप

सांगवी :

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समितीच्या वतीने आयोजित आंतरमहाविद्यालयीन मैदानी क्रीडा स्पर्धा दिनांक ९ व १० ऑक्टोबर २०२५ रोजी उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या बाबुरावजी घोलप महाविद्यालयाच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले.

महाविद्यालयाच्या खेळाडूंनी एकूण ९ सुवर्णपदके व ४ रौप्यपदके जिंकत विजयाची घोडदौड कायम ठेवली. विशेष म्हणजे, सलग तिसऱ्यांदा मुलांच्या एथलेटिक्स चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावून महाविद्यालयाने इतिहास घडवला आहे. तसेच सर्वसाधारण मुले व मुली गटातही विजेतेपद मिळवत सर्वांगीण कामगिरीची नोंद केली आहे.

बाबुरावजी घोलप महाविद्यालयाच्या खेळाडूंनी कठोर परिश्रम, शिस्त आणि संघभावना यांच्या बळावर हे यश संपादन केले असून, महाविद्यालयाच्या क्रीडा परंपरेत ही कामगिरी आणखी एक सुवर्णपान ठरली आहे.

या विजयानंतर पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवार, उपाध्यक्ष मा. श्री. राजेंद्र घाडगे, मानद सचिव मा. ॲड. संदीप कदम, खजिनदार श्री. मोहनराव देशमुख, सहसचिव श्री. एल. एम. पवार, प्रशासन सचिव श्री. ए. एम. जाधव तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संगीता जगताप, उपप्राचार्या डॉ. वंदना पिंपळे व शारीरिक शिक्षण संचालिका डॉ. विद्या पाठारे यांनी सर्व विजेत्या खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन करून आगामी स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.

🏅 विजेत्यांची यादी पुढीलप्रमाणे:

श्रेय शेडगे — 100 मी. व 200 मी. धावणे (२ सुवर्णपदके)

साहिल जगताप — 100 मी. व 200 मी. धावणे (२ सुवर्णपदके)

विश्वजीत शिंदे — 400 मी. धावणे (सुवर्ण), 200 मी. धावणे (रौप्य)

श्रेयस चव्हाण — गोळा फेक व थाळी फेक (२ सुवर्णपदके)

निखिल सहाने — 21 किमी हाफ मॅरेथॉन, 10,000 मी. व 5,000 मी. धावणे (१ सुवर्ण, २ रौप्य)

4 X 100 मी. रिले संघ — रौप्य पदक

श्रीराज चौगुले — 110 मी. हर्डल्स (सुवर्णपदक)

महाविद्यालयाच्या या सलग तिसऱ्या विजयाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, समर्पण आणि सातत्याने प्रयत्न केल्यास कोणतेही यश अशक्य नाही! 🏆