February 4, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

सुतारवाडीतील मुख्याध्यापिका शबनम जमादार यांचा भावस्पर्शी सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न

सुतारवाडी :

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने शनिवार दि. ४ ऑक्टोबर २०२५ रोजी, पोलिसांच्या प्रशस्त सभागृहात म.न.पा. शा. क्र. ७१बी सुतारवाडी येथील मुख्याध्यापिका सौ. शबनम सिकंदर जमादार यांच्या सेवानिवृत्ती निमित्त भावनिक आणि अभूतपूर्व सेवापूर्ती गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

या सोहळ्याचे नियोजन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष मा. सचिन डिंबळे सर तसेच संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी म.न.पा. शा. क्र. ७१बी च्या शिक्षकवृंदासह केले. पुणे शहरातील सर्व पदाधिकारी, महिला आघाडी, शिक्षक, विद्यार्थी, तसेच शबनम मॅडम यांच्या कुटुंबीय व मित्रमंडळींच्या सहकार्याने हा कार्यक्रम अविस्मरणीय ठरला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याध्यक्ष सचिन डिंबळे सर होते. प्रारंभी कार्यक्रमाची सुरुवात हिरामण सगभोर सर यांच्या वि.नी. १६ शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ईशस्तवन आणि स्वागतगीताने झाली. त्यानंतर सत्कारमूर्ती शबनम जमादार मॅडम यांचा भव्य सत्कार करण्यात आला.

यावेळी म.न.पा.तील मान्यवर अधिकारी, मा.पर्यवेक्षक, शा.शि.संघटक, मुख्याध्यापक, शिक्षक, सेवक वर्ग तसेच सुतारवाडी गावातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते. त्यात स्विकृत नगरसेवक सचिनदादा पाषाणकर, शिवमदादा सुतार, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पाषाणकर, माजी विद्यार्थी सुशिल सरकाटे, मोरेश्वर बालवडकर, तसेच सोनाली सुतार यांचा समावेश होता.

संघटनेच्या अनेक नेत्यांनी, उपस्थित शिक्षकांनी व सेवानिवृत्त पर्यवेक्षकांनी या प्रसंगी आपली मनोगते व्यक्त केली. राज्याध्यक्ष सचिन डिंबळे सर यांनी केलेले भावस्पर्शी भाषण उपस्थितांच्या मनाला भिडले. स्वतः शबनम जमादार मॅडम यांनीही कृतज्ञतेने आणि भावनेने परिपूर्ण उत्तर दिले.

सेवापूर्तीचा हा सोहळा म्हणजे एकत्र आलेल्या सहकाऱ्यांच्या प्रेमाचा, सन्मानाचा आणि आपुलकीचा सुंदर आविष्कार होता. अखेरपर्यंत उत्साही वातावरणात कार्यक्रम पार पडला.

या यशस्वी आयोजनाबद्दल शबनम जमादार मॅडम यांनी सर्व पदाधिकारी, शिक्षकवर्ग, कुटुंबीय व उपस्थित पाहुण्यांचे मनःपूर्वक आभार मानले. त्यांनी म्हटले की, “माझ्यावरील आपुलकी आणि स्नेहामुळे हा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात गोड आठवण ठरला आहे.”

शेवटी त्यांनी उपस्थितांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना, “काहींना आमंत्रण पोहोचले नसेल तर त्याबद्दल क्षमस्व,” असे नम्रपणे सांगितले.