November 10, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

सूर्यकांत भुंडे यांच्या उपस्थितीत बावधन पाण्याची टाकी स्वच्छतेचे काम सुरू, नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल

बावधन :

बावधन परिसरात गेल्या काही दिवसांपासून दूषित पाण्याच्या तक्रारी वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज पाणीपुरवठा विभागाकडून तातडीने स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले. या अंतर्गत बावधन येथील मुख्य पाण्याची टाकी स्वच्छ करण्याचे काम सुरू असून त्याची प्रत्यक्ष पाहणी माजी ग्रामपंचायत सदस्य सूर्यकांत भुंडे यांनी केली.

या कामासाठी पाणीपुरवठा व आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य मिळत आहे. नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पाणीपुरवठा मिळावा यासाठी सर्व संबंधित यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत आहेत. दूषित पाण्यामुळे उद्भवणाऱ्या आजारांपासून संरक्षण व्हावे, यासाठी प्रशासनाकडून वेळोवेळी पाण्याचे नमुने तपासून योग्य ती उपाययोजना केली जात आहे.

सूर्यकांत भुंडे यांनी सांगितले की, “नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित कोणतीही तडजोड केली जाणार नाही. पाणीपुरवठा सुरळीत व स्वच्छ राहावा यासाठी आवश्यक ते सर्व पावले उचलली जात आहेत.”

स्थानिक नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत करत प्रशासनाच्या तत्परतेचे कौतुक केले आहे. या मोहिमेमुळे बावधन परिसरातील पाणीपुरवठा अधिक स्वच्छ, सुरक्षित आणि विश्वासार्ह होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.