May 30, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

पुणे शहरातील टेरेस वरील बेकायदा हॉटेल वर कारवाई करा अन्यथा तुमच्यावर कारवाई करणार पालिका आयुक्तांची बांधकाम विभागाला ताकीद..

पुणे :

पुणे शहरात ठिकठिकाणी इमारतींच्या टेरेस वर सुरू असलेल्या बेकायदा हॉटेलांकडे बांधकाम विभागातील अभियंते दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे अशा परिसरातील हॉटेलमुळे जवळपास राहणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास होत असल्याने प्रशासनाकडे खूप तक्रारी येत आहेत. याची दखल पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी घेतली असून बांधकाम विभागातील उपअभियंता, कनिष्ठ अभियंत्यांनी त्यांच्या भागातील हॉटेलवर १५ दिवसांत कारवाई करून त्याची माहिती सादर करावी अन्यथा अधिकाऱ्यांना कारवाईस सामोरे जावे लागेल असे महापालिका आयुक्त आणि प्रशासक विक्रम कुमार यांनी ताकीद दिली आहे.

बांधकाम विभागातील अधिक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंत्यांची आयुक्त विक्रम कुमार यांनी बैठक घेतली. शहरातील मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्ये इमारतीवर रूफ टॉप हॉटेल सुरू झाली आहेत. रात्री उशिरापर्यंत ही हॉटेल सुरू असतात. तेथे लावलेली गाणी, ग्राहकांचा गोंगाट, त्यांच्या गाड्यांमुळे परिसरातील नागरिकांना त्रास होत आहे. महापालिकेची कोणतीही परवानगी नसतानाही हॉटेल सुरू असले तरी बांधकाम विभाग, मिळकतकर विभागाच्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरून बिनधास्तपणे ती सुरू आहेत. अनेक हॉटेलवर राजकीय वरदहस्त असल्याने कारवाई टाळली जाते. मात्र, याबाबत अनेक तक्रारी थेट आयुक्तांकडे आल्याने मंगळवारी या संदर्भात बैठक घेतली. त्यामध्ये इमारतींचे साइड मार्जिन, फ्रंट मार्जिन, गच्चीवर सुरू असलेल्या हॉटेलचा मुद्दा उपस्थित केला.

या हॉटेलमुळे नागरिकांच्या जिवाला धोका आहेच, पण या भागात राहणाऱ्या नागरिकांनाही त्याचा त्रास होत आहे. त्यामुळे अशा हॉटेलवर त्वरित कारवाई झाली पाहिजे. यासाठी कारवाई केलेल्या हॉटेलची १५ दिवसांत माहिती सादर करावी. अन्यथा संबंधित उपअभियंता, कनिष्ठ अभियंत्यांना यासाठी जबाबदार धरले जाईल, असे स्पष्ट शब्दात आयुक्त विक्रम कुमार यांनी सुनावले.