म्हाळुंगे-बालेवाडी :
अस्सल मातीतला खेळ असलेल्या कबड्डीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि कबड्डीपटूंना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी पुण्यात आजपासून (१७ जुलै २०२५) दोन मोठ्या कबड्डी स्पर्धांना जल्लोषात सुरुवात झाली. सतेज संघ, बाणेर आयोजित ‘स्व. शंकरराव उर्फ बुवा साळवी चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा’ आणि बाबूराव चांदेरे सोशल फाऊंडेशन आयोजित ‘पुणे लीग कबड्डी स्पर्धा’ अशा या दोन स्पर्धा आहेत. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सरचिटणीस बाबूराव चांदेरे यांनी याबद्दल माहिती दिली.
म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉल येथे केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मा. श्री. मुरलीधर आण्णा मोहोळ यांच्या शुभहस्ते या स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी बोलताना मंत्री मोहोळ यांनी कबड्डीपटूंना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल आयोजकांचे कौतुक केले आणि भविष्यातही अशा स्पर्धा आयोजित करण्यासाठी कायम सोबत राहण्याचे आश्वासन दिले.
या उद्घाटन सोहळ्याला कोल्हापूर गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष मा. नाविद मुश्रीफ, मंगलदास पांडे, आस्वाद पाटील, सुनिल चांदेरे, सचिन भोसले, राहुल बालवडकर, नंदकुमार धनकुडे, सरला बाबुराव चांदेरे, मनिषा चांदेरे, पुजा चांदेरे आदी मान्यवर उपस्थित होते. संपूर्ण क्रीडांगण कबड्डीपटूंनी भरून गेले असून, विविध सहभागी संघांमध्ये कबड्डीप्रतीची आस्था आणि खेळाचा उत्साह ठळकपणे दिसत आहे.
राज्यस्तरीय निमंत्रित स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पुरुष आणि महिला विभागांतील प्रत्येकी २४ संघ सहभागी झाले असून, एकूण ३३६ खेळाडू आपले कौशल्य दाखवत आहेत. त्याचप्रमाणे, पुणे जिल्ह्यांतर्गत होणाऱ्या पुणे लीग स्पर्धेत पुरुष आणि महिलांचे प्रत्येकी ८ संघ उतरले असून, या लीग स्पर्धेत ३५२ स्थानिक खेळाडूंचा सहभाग असणार आहे. या दोन्ही कबड्डी स्पर्धांचा थरार प्रेक्षकांना २० जुलै २०२५ पर्यंत अनुभवता येणार आहे. बाबूराव चांदेरे यांनी पुणे लीग कबड्डी स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
या दोन्ही स्पर्धांचे उत्कृष्ट आयोजन आणि नियोजन किरण चांदेरे, नासिर सय्यद, अर्जुन शिंदे, माणिक गांधीले, कार्याध्यक्ष पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन दत्तात्रय कळमकर, युवक अध्यक्ष समीर चांदेरे, रामदास धनकुडे, संतोष भुजबळ, युवराज धनकुडे, हरिश्चंद्र मोहिते, आणि संतोष कळमकर यांनी केले.
More Stories
सुस गावातील गणेशोत्सवात बाळासाहेब चांदेरे यांचा सहभाग; भाविकांना दिल्या शुभेच्छा…
पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पिरंगुटची अभिमानास्पद विजेती श्रावणी जाधव
बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी, सुस, महाळुंगे आणि विधाते वस्ती परिसरात पूनम विधाते यांना आरतीचा मान, दिल्या गणेश भक्तांना शुभेच्छा..