पुणे :
युवा सामाजिक कार्यकर्ते व नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या वाढदिवसानिमित्त सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने आयोजित “सुपर सनी मंथ” क्रीडा महोत्सवाअंतर्गत सुरू असलेल्या सोमेश्वर चषक खुल्या व विविध गटातील रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत पाचव्या फेरीनंतर सिद्धांत गायकवाड, रियान मोहम्मद, संकलेचा जिनम, गोरांक्ष खंडेलवाल आणि विहान कांबळे यांनी प्रत्येकी ५ गुणांसह संयुक्त आघाडी घेतली आहे.
पाषाण येथील गोविंद गार्डन मंगल कार्यालयात सुरू असलेल्या या स्पर्धेत खुल्या गटात सिद्धांत गायकवाडने प्रथमेश शेरलाचा पराभव केला, तर दुसऱ्या पटावर रियान मोहम्मदने अंजनेय पाठकवर विजय मिळवत दोघांनीही ५ गुणांची कमाई केली.
१५ वर्षांखालील गटात संकलेचा जिनमने ईशान चोरडियावर मात करत ५ गुणांसह आघाडी कायम राखली. १२ वर्षांखालील गटात तीर्थ कोद्रेने नैतिक मानेसोबत बरोबरी साधून ४.५ गुण मिळवले, तर रौनक कोरेने अधिराज चांडेलचा पराभव करून ४.५ गुणांपर्यंत मजल मारली.
१० वर्षांखालील गटात गोरांक्ष खंडेलवालने आदीना मोहंतीवर विजय मिळवत ५ गुणांची नोंद केली. ८ वर्षांखालील गटात विहान कांबळेने शिव चाकवेला पराभूत करत ५ गुणांसह अव्वल स्थान पटकावले.
स्पर्धेचे उद्घाटन सनी विनायक निम्हण आणि पीएमसीचे उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी एमसीएचे महासचिव राजेंद्र कोंडे, दिक्षा गडसिंग, स्पर्धा समन्वयक अभिजीत मोहिते, अमित मुरकुटे तसेच मुख्य पंच पवन कातकडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सनी विनायक निम्हण म्हणाले, “बुद्धिबळ हा केवळ खेळ नसून तो एकाग्रता, संयम आणि निर्णयक्षमता वाढवणारा बौद्धिक व्यायाम आहे. ‘सुपर सनी मंथ’ अंतर्गत विविध क्रीडा स्पर्धांद्वारे तरुणांना सकारात्मक व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आमचा उद्देश आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले असून भविष्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवावे, हीच अपेक्षा आहे.”




More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी