मुख्याध्यापिका सौ. निर्मल पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली विज्ञान दिनानिमित्त भव्य प्रकल्प प्रदर्शनाचे यशस्वी आयोजन….
सुस : –
चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरीविंकल इंग्लिश मिडीयम स्कूल ॲन्ड ज्युनियर कॉलेजच्या सुस शाखेमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात व दिमाखात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचा शुभारंभ हा रमण यांच्या फोटो पूजनाने व फीत कापून करण्यात आला. यावेळी शाळेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री राजेंद्र बांदल सर संचालिका रेखा बांदल, शिवानी बांदल व मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित आदी मान्यवर उपस्थितीत होते.पाहुण्यांच्या हस्ते फीत कापून विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विज्ञान प्रकल्प प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी आपली वैज्ञानिक जिज्ञासा, संशोधनवृत्ती आणि कल्पकता प्रभावीपणे सादर केली. संपूर्ण शाळा परिसर विज्ञानमय वातावरणाने भारावून गेला होता.
इयत्ता पूर्व-प्राथमिक ते अकरावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर आकर्षक व माहितीपूर्ण प्रकल्प सादर केले. पर्यावरण संवर्धन, सौरऊर्जा, पावसाचे पाणी साठवण, रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, चंद्रयान, स्मार्ट सिटी, जैवविविधता, पाणी शुद्धीकरण तसेच शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान अशा विविध विषयांचा समावेश होता.
विद्यार्थ्यांनी जलचक्र (Water Cycle) या प्रकल्पाद्वारे पाण्याच्या बाष्पीभवन, संघनन व वर्षाव प्रक्रियेचे सुंदर मॉडेल सादर केले. हायड्रॉलिक पूल (Hydraulic Bridge) या प्रकल्पातून द्रवदाबाच्या तत्त्वावर पूल कसा उचलला जातो याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. पावसाचा शोधक (Rain Detector) या उपकरणाद्वारे पावसाची चाहूल लागताच सिग्नल देणारी यंत्रणा सादर करण्यात आली. तसेच हृदयाचे कार्यरत मॉडेल (Heart Working Model) सादर करून विद्यार्थ्यांनी रक्ताभिसरण प्रक्रिया प्रभावीपणे स्पष्ट केली. या सर्व प्रकल्पांमधून विद्यार्थ्यांची वैज्ञानिक समज, निरीक्षणशक्ती आणि प्रयोगशीलता स्पष्टपणे जाणवली.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे इयत्ता नववीच्या ऋषिकेश सूर्यवंशी या विद्यार्थ्याने साकारलेली सी.व्ही. रमण यांची वेशभूषा. त्यांनी ‘रमण प्रभाव’ व त्यांच्या संशोधनकार्याविषयी प्रभावी माहिती देत उपस्थितांची दाद मिळवली आणि विज्ञान क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची प्रेरणा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली.
या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. निर्मल पंडित यांच्या अध्यक्षतेखाली अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आले. पर्यवेक्षक नेहा माळवदे, सचिन खोडके, स्मिता श्रीवास्तव तसेच विज्ञान शिक्षक कृष्णा अंभूरे, वैशाली घाडगे आणि इतर शिक्षकवृंद व विद्यार्थी वर्ग यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला.परीक्षकांनी नाविन्य, सादरीकरण, उपयोगिता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या निकषांवर प्रकल्पांचे मूल्यमापन केले. उत्कृष्ट प्रकल्पांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. पालकांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे व आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाचे विशेष कौतुक केले.
विज्ञान दिनाचा मुख्य उद्देश – विज्ञानाचा समाजकल्याणासाठी उपयोग – या प्रदर्शनातून प्रभावीपणे साध्य झाला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, प्रश्न विचारण्याची वृत्ती, समस्यांचे समाधान शोधण्याची क्षमता आणि नवसर्जनाची प्रेरणा अधिक दृढ झाली.
अशा प्रकारे सुस शाखेमध्ये साजरा झालेला विज्ञान दिन विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी, ज्ञानवर्धक आणि संस्मरणीय ठरला.



More Stories
बावधन शाखेच्या पेरीविंकल इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये पूर्व-प्राथमिक विभागातील चिमुकल्यांनी भरवली विज्ञान शाळा!
पेरीविंकल पौड शाखेत जागतिक विज्ञान दिन उत्साहात साजरा.
पिरंगुट शाखेच्या पेरीविंकल शाळेच्या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन नवनिर्वाचित मुळशी पंचायत समिती सदस्य श्री राहुल पवळे यांच्या हस्ते!!