February 4, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेर-बालेवाडी वाहतूक समस्यांबाबत उच्चस्तरीय बैठक : तातडीने उपाययोजनांचे नामदार चंद्रकांत दादांचे आदेश..

बाणेर :

बाणेर-बालेवाडी परिसरातील नागरिकांनी दीर्घकाळ भेडसावत असलेल्या वाहतूक कोंडी, अतिक्रमण, अपूर्ण रस्ते आणि सार्वजनिक सोयी-सुविधा यासंदर्भात आज एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत पुणे महापालिका, वाहतूक पोलिस, पोलिस आयुक्त कार्यालय, एनएचएआय, पीएमआरडीए आदी संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत कोथरूड मतदारसंघाचे आमदार तथा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील प्रमुख उपस्थित होते. त्यांनी नागरिकांकडून आलेल्या समस्यांची गांभीर्याने नोंद घेतली आणि संबंधित विभागांना तातडीने उपाययोजना करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. सण-उत्सवाचा काळ सुरू होण्याआधी सर्व प्रमुख प्रश्न मार्गी लागावेत, यासाठी तत्काळ कारवाई करण्याचे आदेश मा. पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले.

बैठकीत नागरिकांनी ज्या मुद्द्यांवर भर दिला त्यात जुपिटर चौक, गणपती मंदिर चौक, दसरा चौक, ममता चौक, सीएम इंटरनॅशनल, साई चौक, राधा चौक येथील वाहतूक नियोजन, सिग्नल, वॉर्डन्सची संख्या वाढवणे, अतिक्रमण हटवणे, अपूर्ण रस्त्यांची कामे पूर्ण करणे, पाणी साचणाऱ्या ठिकाणी ड्रेनेज दुरुस्ती, सबस्टेशनची उभारणी आणि दारू दुकानदारामुळे होणारा त्रास हे विषय होते.

नागरिकांनी विशेषतः नानावरे ब्रिजजवळील साचलेले पाणी, पदपथ अतिक्रमण, बसस्टॉपची आवश्यकता, रस्ते व फूटपाथ दुरुस्ती, झाडांची छाटणी, मेट्रो पुलाखालच्या ठिकाणी साचलेले पाणी, आणि रस्ते अधिग्रहणाच्या समस्यांबाबत सविस्तर मांडणी केली. यावर प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.

या बैठकीत वर्षानुवर्ष प्रलंबित असलेला सदानंद रेसिडेन्सी हॉटेलजवळील सर्व्हिस रोड अंडरपास संदर्भातील मुद्दाही उपस्थित करण्यात आला. यावर त्वरित उपयोजना करून काम सुरू करण्याच्या सूचना NHAI अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असून, हे काम युद्धपातळीवर सुरू करण्याचे निर्देश चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले.

या बैठकीत बालेवाडी वेल्फेअरचे सर्व फेडरेशनचे प्रतिनिधी, तसेच पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, सुस, महाळुंगे येथील विविध सोसायट्यांचे पदाधिकारी, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी कोथरूड उत्तर मंडळ अध्यक्ष लहू बालवडकर, माजी नगरसेवक अमोल बालवडकर, माजी नगरसेविका ज्योतीताई कळमकर, माजी नगरसेविका स्वप्नाली सायकर, पुणे शहर सरचिटणीस्ट गणेश कळमकर, पुनीत जोशी, प्रकाश तात्या बालवडकर, प्रल्हाद सायकर,  सचिन पाषाणकर, सचिन दळवी, मोरेश्वर बालवडकर, राहुल कोकाटे,  शिवम सुतार, शिवम बालवडकर, अस्मिता करंदीकर तसेच कोथरूड उत्तर मंडलाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.