February 4, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेरमधील १०० मीटर डीपी रस्त्याच्या कामाची पालिका अधिकाऱ्यांची पाहणी; नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी तातडीने काम सुरू करण्याची समीर चांदेरे यांची मागणी

पुणे:

बाणेर परिसरातील अत्यंत रहदारीच्या महामार्गालगत असलेल्या अर्धवट अवस्थेतील १०० मीटर डीपी रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पुणे शहर अध्यक्ष समीर चांदेरे यांनी मनपा अधिकाऱ्यांसोबत या कामाची पाहणी केली. या कामासाठी पुणे महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष मा. बाबुराव चांदेरे यांनी मार्गदर्शन केले. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

या पाहणीदरम्यान समीर चांदेरे यांच्यासोबत मनपाचे अधिक्षक अभियंता आशित जाधव, पथविभागाचे कार्यकारी अभियंता रमेश वाघमारे आणि उपअभियंता दिलीप काळे उपस्थित होते. बाणेर परिसरातील विविध सोसायट्यांमधील रहिवाशांनीही यावेळी उपस्थित राहून अधिकाऱ्यांकडे आपली समस्या मांडली.

महामार्गाच्या बाजूचा हा रस्ता अपूर्ण असल्याने स्थानिक रहिवाशांना मोठ्या अडचणी येत आहेत. रहिवाशांतर्फे महानगरपालिका अधिकाऱ्यांना या रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याची आणि वेळेत पूर्ण करण्याची विनंती करण्यात आली, जेणेकरून नागरिकांची गैरसोय टळेल.

याबद्दल माहिती देताना समीर चांदेरे म्हणाले, “बाणेरमधील नागरिकांची गैरसोय थांबवण्यासाठी या अर्धवट रस्त्याचे काम तातडीने पूर्ण होणे आवश्यक आहे. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी या कामाला प्राधान्य देऊन ते लवकरात लवकर सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे.”