पुणे, [8/7/26]:
बाणेर भागातील ननवरे चौकाला जोडणारा १०० मीटर लांबीचा डीपी (डेव्हलपमेंट प्लॅन) रस्ता जो अर्धवट अवस्थेत होता, तो आता लवकरच पूर्णत्वास जाणार आहे. या रस्त्याच्या कामातील अडथळे दूर झाले असून, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त श्री. नवल किशोर राम यांनी हे काम तातडीने पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना होणारी वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका टळणार आहे.
पॅनकार्ड क्लब रस्ता ते ननवरे चौक दरम्यानचा २४ मीटर डीपी रस्ता उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. अजित पवार यांच्या पुढाकाराने आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष श्री. बाबुराव चांदेरे यांच्या प्रयत्नांमुळे यापूर्वीच पूर्ण झाला आहे. मात्र, ननवरे चौकाला जोडणारा १०० मीटरचा रस्ता अर्धवट राहिल्याने परिसरातील विविध गृहनिर्माण संस्थांमधील रहिवाशांना बिटवाईज चौकातून फिरून यावे लागत होते, ज्यामुळे त्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते.
या गंभीर समस्येची दखल घेत, राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर युवक अध्यक्ष समीर चांदेरे यांनी, यश ऑर्किड सोसायटीचे कमलेशभाऊ काळे, श्रीकांत कंझारकर (रिजेन्सी ओरियन सोसायटी), सूचित आवळगावकर, सुनील गिराम (राहुल अर्कस सोसायटी) आणि उमेश रोडे (यश ऑर्किड) यांसारख्या विविध सोसायट्यांमधील नागरिकांसह पुणे महानगरपालिकेचे आयुक्त श्री. नवल किशोर राम यांची भेट घेतली. यावेळी निवेदन पत्राद्वारे आयुक्तांकडे अपूर्ण रस्ता तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली. आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत रस्त्याचे काम वेगाने करण्याचे आश्वासन दिले.
यापूर्वी, १७ मे रोजी टाटा टेक्नॉलॉजीस लिमिटेडच्या उद्घाटन कार्यक्रमावेळी नागरिकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन हा प्रश्न त्यांच्यासमोर मांडला होता. त्यावेळी त्यांनी संबंधित महानगरपालिका अधिकाऱ्यांना रस्त्याचा विषय मार्गी लावण्याबाबत सूचना दिल्या होत्या.
या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यावर कळमकर चौक, मुरकुटे गार्डन चौक आणि बिटवाईज कंपनी चौक येथील वाहतूक समस्या संपुष्टात येईल आणि नागरिकांना सुरक्षित व सुलभ प्रवासाचा लाभ मिळेल, अशी अपेक्षा आहे. या महत्वपूर्ण कामासाठी पुढाकार घेतल्याबद्दल उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार, महानगरपालिका आयुक्त श्री. नवल किशोर राम आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष श्री. बाबुराव चांदेरे यांचे परिसरातील नागरिकांकडून मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहेत.



More Stories
पुणे आयडॉल २०२६ ची महाअंतिम फेरी १० मे रोजी बालगंधर्व येथे – ५६० स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग; विविध क्षेत्रातील मान्यवरांना ‘व्हॉइस ऑफ चॉईस’ विशेष पुरस्कार प्रदान करण्यात येणार
राजभवन (लोकभवन) मार्ग विस्तारीकरणाला गती; कामाचा शुभारंभ, वाहतूक कोंडीवर लवकरच दिलासा – नगरसेवक सनी निम्हण यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश
बालेवाडीत कचरा समस्येवर मोरेश्वर बालवडकर यांचे सहाय्यक आयुक्तांना निवेदन; १५ दिवसांत उपाय न झाल्यास आंदोलनाचा इशारा