February 5, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

पुणे लीग कबड्डी स्पर्धा २०२५: निवड चाचणीचा म्हाळुंगे-बालेवाडी येथे थाटात शुभारंभ!

पुणे:

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री, मा. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केल्या जाणाऱ्या “पुणे लीग कबड्डी स्पर्धा २०२५” साठीच्या निवड चाचणीचा आज श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी येथे मोठ्या उत्साहात शुभारंभ झाला. बाबुराव चांदेरे सोशल फाउंडेशन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (बाणेर-बालेवाडी-सुस-म्हाळुंगे) यांच्या वतीने पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने ही स्पर्धा दरवर्षी आयोजित केली जाते.

आज झालेल्या या निवड चाचणीचा शुभारंभ सतेज संघाचे अध्यक्ष, मा. नासिर सय्यद यांच्या हस्ते आणि इतर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. या निवड चाचणीत ४५० पुरुष आणि २०० महिला, अशा एकूण ६५० हून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवला, जी कबड्डीच्या वाढत्या लोकप्रियतेचे आणि युवा पिढीच्या या खेळावरील प्रेमाचे उत्तम प्रतीक आहे.
निवड चाचणीतून उत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंची “पुणे लीग कबड्डी स्पर्धा २०२५” साठी निवड केली जाईल आणि त्यांचे संघ तयार करण्यात येतील.

यावेळी निवड समिती सदस्य म्हणून आत्माराम कदम, दिनेश धावडे, श्रीकांत सायकर, सचिन शिंदे, अर्चना शिंदे, सोनाली झोळे, ज्योती पाटील-साळुंखे यांनी काम पाहिले.

हि स्पर्धा महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह बाबुराव चांदेरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत असून संयोजन समिती अध्यक्ष किरण बाबुराव चांदेरे काम पाहत आहे तसेच पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष समीर चांदेरे यांच्या देखरेखीखाली हि स्पर्धा संपन्न होणार आहे.

या निवड चाचणीचे उद्‌घाटन महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह बाबुराव चांदेरे, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह दत्तात्रेय झिंजुर्डे, राजेंद्र ढमढेरे, संदीप पायगुडे, सलमा शेख, अर्जुन शिंदे, नासीर सय्यद, अर्जुन रनवरे तसेच पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सर्व कार्यकारणी सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाले.

पुणे लीग कबड्डी स्पर्धा आणि राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा २०२५ ही स्पर्धा १७ जुलै ते २० जुलै २०२५ या कालावधीमध्ये महाळुंगे – बालेवाडी येथील श्री शिव छत्रपती क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलमध्ये संपन्न होणार आहे. या स्पर्धेचा उद्‌घाटन समारंभ दि. १७ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता राज्यसभेच्या खासदार सौ. सुनेत्रा वहिनी पवार, पार्थ पवार, जय पवार यांच्या शुभहस्ते होणार आहे.

या कार्यक्रमाचा बक्षिस समारंभ २० जुलै २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अजित दादा पवार साहेब यांच्या शुभहस्ते त्याचबरोबर क्रीडामंत्री दादा भुसे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, केंद्रीय वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, विधानसभेचे उपसभापती अण्णा बनसोडे, भोर वेल्हा, मुळशी विधानसभा मतदार संघाचे आमदार शंकर भाऊ मांडेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.