November 22, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

*जिद्द, जिंकण्याची उमेद आणि खिलाडूवृत्तीचा जल्लोष! पेरिविंकल बावधनच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचे दिमाखात उद्घाटन!*

बावधन :

चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, बावधन येथे शनिवार, दिनांक २१ नोव्हेंबर २०२६ रोजी वार्षिक क्रीडा महोत्सवाचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र केसरी सुवर्णपदक विजेते पै. अमोल वालुगडे, एशियन चॅम्पियनशिप सुवर्णपदक विजेते पै. हर्षद चिमटे, राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतील कांस्यपदक विजेते पै. अभिजीत जाधव, स्टेट लेव्हल क्रिकेटपटू व ISPL क्रिकेट लीगसाठी निवड झालेले श्री. महेश नानगुडे, तसेच युवा नेते मा. श्री. अभिजीत दगडे , राष्ट्रीय कोच रणसिंग राजपुत आदी मान्यवरांसमवेत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. राजेंद्र बांदल सर, संचालिका मा. सौ. रेखा बांदल, संचालिका मा. कु. शिवानी बांदल, संचालक मा. श्री. यश बांदल आणि प्राचार्या सौ. निर्मल पंडित यांचीही उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या स्वागताने व सत्काराने झाली. त्यानंतर मशाल प्रज्वलन सोहळा पार पडला. क्रीडाक्षेत्रातील नामवंत खेळाडूंच्या उपस्थितीमुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा, उत्साह आणि खेळाडूंच्या यशस्वी प्रवासातून शिकण्याची संधी मिळाली.

यावेळी संस्थेचे संस्थापक मा. श्री. राजेंद्र बांदल सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अपयश ही यशाची पहिली पायरी असल्याचे सांगितले. प्रत्येक अपयशातून काहीतरी शिकून पुन्हा नव्या जोमाने प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले. खेळामध्ये जिंकण्याइतकेच पराभवातून शिकणेही महत्त्वाचे असल्याचे सांगत त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना वार्षिक क्रीडा महोत्सवासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

पै. अमोल वालुगडे, पै. हर्षद चिमटे आणि पै. अभिजीत जाधव यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत खेळातील मेहनत, सातत्य, शिस्त, संघर्ष आणि समर्पणाचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी नियमितपणे खेळांमध्ये सहभागी व्हावे, शारीरिक तंदुरुस्ती जपावी आणि आपल्या देशाचे नाव उज्ज्वल करण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन त्यांनी केले. यशस्वी खेळाडू घडण्यासाठी कठोर परिश्रम, आत्मविश्वास आणि शिस्त आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

युवा नेते मा. श्री. अभिजीत दगडे यांनीही याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी पेरिविंकल संस्थेच्या शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील वाटचालीचे कौतुक केले. संस्थेच्या व्यवस्थापनाचे दूरदृष्टीपूर्ण कार्य, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतले जाणारे प्रयत्न आणि विविध उपक्रमांचे त्यांनी विशेष कौतुक केले. विद्यार्थ्यांना वार्षिक क्रीडा महोत्सवासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देतानाच संपूर्ण पेरिविंकल संस्थेच्या पुढील वाटचालीसाठीही शुभेच्छा व्यक्त केल्या.

या सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे शाळेतील आंतरशालेय क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ.

*पारितोषिक प्राप्त विद्यार्थी :*

– रुद्र लांडगे – ग्रीको कुस्ती, तालुकास्तरीय स्पर्धा – सुवर्णपदक
– स्वराज सणस – कुस्ती, तालुकास्तरीय स्पर्धा – सुवर्णपदक
– स्वरन्या नायडू – तायक्वांदो, तालुकास्तरीय स्पर्धा – सुवर्णपदक
– दीप बडेकर – तायक्वांदो, तालुकास्तरीय स्पर्धा – सुवर्णपदक
– रणवीर मिरघे – तायक्वांदो, तालुकास्तरीय स्पर्धा – कांस्यपदक

या विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले व भविष्यातील क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीचाही विशेष गौरव करण्यात आला.

यानंतर विद्यार्थ्यांनी क्रीडा शपथ ग्रहण केली. खिलाडूवृत्ती, प्रामाणिकपणा, शिस्त आणि खेळातील नियमांचे पालन करण्याचा संकल्प सर्वांनी केला. राष्ट्रगीताने उद्घाटन समारंभाची सांगता झाली आणि खो-खोच्या उद्घाटन सामन्याने प्रत्यक्ष क्रीडा स्पर्धांना प्रारंभ झाला.

विद्यार्थ्यांमधील सुप्त क्रीडागुणांना वाव मिळावा, त्यांच्यामध्ये संघभावना, नेतृत्वगुण, आत्मविश्वास, शिस्त आणि खिलाडूवृत्ती विकसित व्हावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या क्रीडा महोत्सवामुळे संपूर्ण शालेय परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

“मैदानावर घाम गाळणारेच आयुष्यात यशाचे शिखर गाठतात; जिद्द, शिस्त आणि मेहनतीच्या जोरावर प्रत्येक स्वप्नाला विजयाची किनार लाभते!”
याच प्रेरणादायी विचारांसह पेरिविंकलच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाची दिमाखदार सुरुवात झाली.

या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या प्राचार्या सौ. निर्मल पंडित यांच्या अध्यक्षतेखाली, पर्यवेक्षिका सौ. सायली गायकवाड व सौ. शिरीन काझी यांच्या नेतृत्वाखाली, क्रीडा शिक्षक सूरज साठे आणि विशाल टाकमोघे यांच्या सहकार्याने तसेच सर्व विद्यार्थी व शिक्षकवृंद यांच्या सहभागातून अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आले होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ. सायली गायकवाड यांनी केले.