November 21, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

योगीराज पतसंस्थेकडून दुष्काळग्रस्त भागातील गरीब मुलींच्या लग्नासाठी संपूर्ण भांड्यांचा संसार भेट

सामाजिक बांधिलकी जपत अनिता चौरे व शिवानी पारखे यांच्या विवाहासाठी मदतीचा हात; ज्ञानेश्वर तापकीर यांचा पुढाकार

बाणेर :

सामाजिक बांधिलकी आणि सहकाराच्या माध्यमातून समाजातील गरजू घटकांना मदतीचा हात देण्याची परंपरा जपणाऱ्या योगीराज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, बाणेर यांच्या वतीने परभणी जिल्ह्यातील अतिशय गरीब कुटुंबातील अनिता चौरे व शिवानी पारखे या दोन मुलींच्या विवाहानिमित्त संपूर्ण भांड्यांचा संसार भेट देण्यात आला. या उपक्रमातून संस्थेने सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवत गरजू कुटुंबांच्या आनंदात सहभागी होण्याचा स्तुत्य प्रयत्न केला आहे.

महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये दुष्काळी परिस्थितीमुळे सर्वसामान्य कुटुंबांचे जीवनमान अडचणीत आले आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत आर्थिक विवंचनेत असलेल्या कुटुंबांना आपल्या मुलींचे लग्न करणे मोठे आव्हान ठरते. ही परिस्थिती लक्षात घेऊन योगीराज पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर तापकीर यांच्या पुढाकारातून अनिता चौरे व शिवानी पारखे यांच्या विवाहासाठी संपूर्ण भांड्यांचा संसार भेट देण्याचा निर्णय घेण्यात आला.

हा संसार ह.भ.प. संजय बालवडकर व अभिनव शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोकराव मुरकुटे यांच्या शुभहस्ते मुलींचे मामा श्री. अमृत खंदारे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. या मदतीमुळे दोन्ही मुलींच्या कुटुंबांना मोठा आधार मिळाला असून, त्यांच्या विवाहाच्या आनंदात योगीराज पतसंस्थेने आपले योगदान दिले आहे.

यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर तापकीर म्हणाले की, महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली असताना अनेक गरीब कुटुंबांना दैनंदिन जीवन जगतानाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत मुलींचे लग्न करणे हे त्यांच्या कुटुंबासाठी आर्थिकदृष्ट्या जिकिरीचे ठरते. त्यामुळे समाजातील गरजू आणि वंचित घटकांना मदत करणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे, या भावनेतून योगीराज पतसंस्थेच्या वतीने या दोन्ही मुलींना संसारोपयोगी भांड्यांची भेट देण्यात आली आहे.

तसेच, यापुढेही दुष्काळी भागातील गरीब व गरजू कुटुंबातील मुलींचे लग्न ठरल्यास त्यांनी योगीराज पतसंस्थेशी संपर्क साधावा. अशा कुटुंबांना शक्य ती मदत करण्यासाठी संस्था सदैव तत्पर आणि कटिबद्ध राहील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

योगीराज पतसंस्था ही केवळ आर्थिक व्यवहार करणारी संस्था नसून सामाजिक बांधिलकी जपणारी संस्था म्हणूनही कार्यरत आहे. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, गरजू रुग्णांना वैद्यकीय सहाय्य तसेच नैसर्गिक आपत्तीच्या काळात मदतीचा हात अशा विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून संस्था समाजाप्रती आपले योगदान देत आहे. याच सामाजिक कार्याचा एक भाग म्हणून गरीब मुलींच्या विवाहासाठी केलेली ही मदत निश्चितच कौतुकास्पद ठरत आहे.

याप्रसंगी संस्थेचे शाखाध्यक्ष श्री. राजेंद्र मुरकुटे व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. दत्तात्रय गंगणे उपस्थित होते.

 

You may have missed