बालेवाडी :
बालेवाडी येथील साई चौकातील आर. के. लक्ष्मण संग्रहालयाशेजारी असलेल्या कचरा वर्गीकरण केंद्राचे अक्षरशः कचरा डेपोमध्ये रूपांतर झाले आहे. या ठिकाणी कचऱ्याचे मोठमोठे ढीग साचले असून, परिसरात सर्वत्र कचरा पसरल्याने दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक, पादचारी तसेच मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
या गंभीर समस्येकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बाणेर बालेवाडी नागरिक मंच (BBNM) गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करत आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
कचरा वर्गीकरण केंद्राच्या नावाखाली सुरू असलेल्या या प्रकारामुळे सार्वजनिक परिसराचे विद्रूपीकरण होत असून, नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. परिसरातील स्वच्छता आणि नागरिकांचे आरोग्य लक्षात घेता प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन कचरा डेपो तातडीने हटवावा, अशी मागणी BBNM च्या वतीने करण्यात आली आहे.
दरम्यान, BBNM ने महापालिका प्रशासनाला २७ नोव्हेंबर २०२६ पर्यंत कचरा डेपो हटविण्याबाबत ठोस निर्णय घेऊन प्रत्यक्ष कार्यवाही सुरू करण्याची अंतिम मुदत दिली आहे. या मुदतीत प्रशासनाने सकारात्मक पावले न उचलल्यास २८ नोव्हेंबर रोजी ज्येष्ठ नागरिक श्री. अशोक नवाल आणि श्री. परशुराम तारे यांच्या नेतृत्वाखाली लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा मंचाच्या वतीने देण्यात आला आहे.
दोन वर्षांचा पाठपुरावा करूनही प्रश्न कायम असल्याने आता नागरिकांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला असून, महापालिका प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे बाणेर-बालेवाडीकरांचे लक्ष लागले आहे.



More Stories
भाजपच्या २४x७ पाणीपुरवठा योजनेवर १,६०० कोटींचा खर्च; तरीही ३२% पाणीगळती! मग पुणेकरांवर पाणीकपात कशासाठी? नगरसेवक अमोल बालवडकर आक्रमक
समाजासाठी अहोरात्र झटणाऱ्यांचा दिवाळी स्नेहमेळावा; बालेवाडी वेल्फेअर फेडरेशनचा दरवर्षी प्रमाणे अनोखा उपक्रम
*पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा वृक्षारोपण व सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध करून द्या – अमोल बालवडकर*