पुणे :
पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वरील बाणेर-बालेवाडी-सुस-म्हाळुंगे-पाषाण-सुतारवाडी या परिसरातून जाणाऱ्या महामार्गाच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात मोकळी जागा उपलब्ध आहे. या जागेवर वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन तसेच परिसराचे सुशोभीकरण (गार्डनिंग) करण्याची मागणी नगरसेवक अमोल रतन बालवडकर यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे केली आहे.
पाषाण तलाव ते मुळा नदी या दरम्यानच्या सुमारे ५.५ ते ६ किलोमीटरच्या परिसरात महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वृक्षारोपण व सुशोभीकरणासाठी पुरेशी जागा उपलब्ध आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या भागातील नागरिकांकडून महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या मोकळ्या जागेत विविध प्रकारची झाडे, फुलझाडे लावणे, वृक्षसंवर्धन करणे तसेच भिंतींवर आकर्षक चित्रे रेखाटून परिसर सुशोभित करण्याची मागणी होत आहे.
या पार्श्वभूमीवर नगरसेवक अमोल रतन बालवडकर यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंत्यांना लेखी निवेदन देऊन या कामासाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
या परिसरात नियोजनबद्ध पद्धतीने वृक्षारोपण आणि उद्यान सुशोभीकरण केल्यास महामार्गाचे सौंदर्य वाढण्यासोबतच पर्यावरण संवर्धनालाही मोठी मदत होणार आहे. तसेच परिसरातील नागरिकांना स्वच्छ, सुंदर आणि हिरवेगार वातावरण उपलब्ध होईल.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन आवश्यक निधी मंजूर करावा आणि वृक्षारोपण व सुशोभीकरणाच्या कामाची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी अमोल रतन बालवडकर यांनी केली आहे.


More Stories
समाजासाठी अहोरात्र झटणाऱ्यांचा दिवाळी स्नेहमेळावा; बालेवाडी वेल्फेअर फेडरेशनचा दरवर्षी प्रमाणे अनोखा उपक्रम
*धुळे येथील योग राज्यस्तरीय स्पर्धेत ‘मानसी’च्या १६ मुलींची दमदार कामगिरी,ना. चंद्रकातंदादा पाटील यांच्यावतीने सर्व मुलींचे विशेष कौतुक*
*दिवंगत श्रीपाद ढेकणे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कोथरूडमध्ये अभ्यासिका,**ना. चंद्रकांतदादा पाटील यांचा पुढाकार*