महाळूंगे :
महाळूंगे येथील सारथी सोविनीर सोसायटीमध्ये सुस-महाळूंगे बॉर्डर सोसायटिज असोसिएशनची सर्वसाधारण सभा नुकतीच उत्साहात पार पडली. या सभेत आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली. असोसिएशनमधील सर्व सोसायटी सभासदांनी एकमताने पुणे महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष श्री. बाबूराव चांदेरे यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला. यासंबंधीचे एक पत्र देखील असोसिएशनच्या वतीने श्री. चांदेरे यांना देण्यात आले.
सभेदरम्यान बोलताना अनेक सभासदांनी २०२१ साली सुस आणि महाळूंगेचा समावेश पुणे महानगरपालिकेत झाल्यापासून श्री. बाबूराव चांदेरे यांनी या दोन्ही गावांसाठी केलेल्या विविध विकासकामांचे स्मरण केले. रस्ते, सांडपाणी व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय आणि इतर जनहिताची कामे मार्गी लावल्याबद्दल सभासदांनी त्यांचे आभार मानले.
यावेळी श्री. बाबूराव चांदेरे यांनी आपल्या राजकीय जीवनातील सुरुवातीच्या आठवणी गमतीशीर पद्धतीने सांगितल्या. त्यांनी पुणे महानगरपालिकेत मागील तीन टर्ममधील (१५ वर्षे) अनुभव तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. अजित (दादा) पवार यांचे वेळोवेळी मिळालेले मार्गदर्शन आणि साथ याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या भागातील लोकांशी आपली एक कौटुंबिक बांधिलकी जोडली गेली असून या भागाच्या विकासासाठी आपण नेहमी प्रयत्नशील राहू, असा विश्वास श्री. चांदेरे यांनी व्यक्त केला.
सभेचे नियोजन सुस महाळूंगे बॉर्डर सोसायटिज असोसिएशनचे अध्यक्ष श्री. सुदीप पाडाळे यांनी केले होते. प्रमुख पाहुणे म्हणून बाबूराव चांदेरे यांच्यासोबत पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्री. समीर चांदेरे उपस्थित होते.
असोसिएशनचे कार्याध्यक्ष श्री. महेश पाडाळे, सचिव श्री. शंकर पवार, खजिनदार श्री. रमेश धनगर यांच्यासह १७ सोसायट्यांमधील अनेक सभासद या महत्त्वपूर्ण सभेत सहभागी झाले होते.
More Stories
बाणेर येथे ज्योती कळमकर यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष योग मार्गदर्शनाचे आयोजन
सोमेश्वरवाडीत चंद्रकांत दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सचिन दळवी सोशल फाउंडेशनच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न..
मतदार नोंदणी अभियान: बाणेरमध्ये लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी सौ पुनम विशाल विधाते यांचा पुढाकार..