April 16, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

छत्रपती चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा उत्साहात संपन्न : शंभूराजे क्रिकेट क्लब विजेता

चांदे :

शंभूराजे क्रिकेट ग्राउंड, चांदे येथे पार पडलेल्या छत्रपती चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेचा उत्साहपूर्ण समारोप झाला. तब्बल १० संघांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवत क्रिकेटप्रेमींना दिवसभर रंगलेल्या सामन्यांचा मनमुराद आनंद लुटू दिला.

 

गेल्या एक महिन्यापासून सुरु असलेल्या या स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम सामना अत्यंत चुरशीचा ठरला. या निर्णायक लढतीत शंभूराजे क्रिकेट क्लब ने आपली बाजी मारत विजेतेपद पटकावले, तर लक्ष्य संघ उपविजेता ठरला. स्पर्धेदरम्यान विविध खेळाडूंनी आपल्या कौशल्याचे उत्तम प्रदर्शन करत क्रिकेटरसिकांची मने जिंकली.

विशेष पारितोषिक विजेते :

विजेता संघ – शंभूराजे क्रिकेट क्लब

उपविजेता संघ – लक्ष्य टीम

मालिकावीर व उत्कृष्ट फलंदाज – पंकज चेमटे

उत्कृष्ट गोलंदाज – विशाल मांडेकर

उत्कृष्ट क्षेत्ररक्षक – विशाल लोंढे

या सर्व विजेत्यांना आकर्षक पारितोषिकांनी गौरवण्यात आले.

स्पर्धेचे यशस्वी आयोजन श्री. आण्णासो पाटील (पाटील नगर, सूस) यांनी केले. त्यांच्या उत्कृष्ट संयोजनामुळे स्पर्धेचे सर्व सामने अत्यंत नियोजनबद्ध व सुरळीत पार पडले. श्री. पाटील यांनी सांगितले की, “नोकरी व व्यवसायामुळे दैनंदिन जीवनात निर्माण होणाऱ्या तणावातून काही क्षण विश्रांती व व्यायाम मिळावा, या उद्देशानेच ही तिसरी स्पर्धा आयोजित केली होती.” त्यांनी पुढे सांगितले की येत्या १२ एप्रिलपासून आणखी एक स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.

स्पर्धेच्या यशस्वी नियोजनामध्ये श्री. अमृत कुलकर्णी (सूस), श्री. अविनाश ससार व देविदास खाणेकर (चांदे) यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

आयोजकांनी सर्व सहभागी संघ, खेळाडू, प्रेक्षक व सहकार्य करणाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.