पुणे :
वनराईचे संस्थापक अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री पद्मविभूषण डॉ. मोहन धारिया यांच्या जन्मशताब्दी निमित्त वनराईतर्फे पुणे शहरात विविध पर्यावरण शिक्षण उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या विद्यापीठ हायस्कूलला ‘हरित शाळा पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले.
विद्यापीठ हायस्कूलमध्ये पर्यावरण विषयक अनेक उपक्रम राबवले गेले. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जागृती निर्माण करण्यासाठी कागदी व कापडी पिशव्या निर्मिती, बीज संकलन, रोपे लागवड व संवर्धन, वृक्षदिंडी, जलदिंडी, औषधी वनस्पती लागवड व जतन, पर्यावरण विषयक व्याख्याने यांसारखे उपक्रम आयोजित करण्यात आले. मुख्याध्यापक विष्णू मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपक्रम यशस्वीपणे पार पडले.
पुरस्कार वितरण समारंभात डॉ. रोहिदास मोरे आणि सागर धारिया यांच्या हस्ते विद्यापीठ हायस्कूलला ‘हरित शाळा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. तसेच लिटल चॅम्प्स गायिका अंजली गायकवाड हिच्या हस्ते विद्यार्थिनी सोनाली घोडके हिला पर्यावरण विषय प्रकल्प सादरीकरण पुरस्कार, शिक्षिका वैशाली सैंधाणे यांना उपक्रमशील शिक्षिका पुरस्कार तर स्मिता जाधव यांना सर्वोत्कृष्ट हरित शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
कार्यक्रमात प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ‘प्लास्टिकचा भस्मासूर’ हे नाटक सादर केले. यावेळी मुख्याध्यापक विष्णू मोरे, संचालक बसवंत विठाबाई बाबाराव, सचिव अमित वाडेकर, अकोल्याचे बबनराव कानकिरड तसेच विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
शिवराज्याभिषेक दिन: ‘सेवेसमर्पणाचा संकल्प’ अंतर्गत सौ पूनम विधाते यांच्या वतीने शालेय साहित्य वाटप
जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशनकडून बाणेर वाहतूक पोलिसांना रेनकोट वाटप
बाणेर येथे जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशन आणि BPT सेवा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तुकाई टेकडी स्वच्छता अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद..