पिरंगुट :
पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात पार पडला. हसण्याच्या आणि आसवांच्या संगमात झालेल्या या समारंभात विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनाच्या आठवणींना उजाळा दिला आणि पुढील वाटचालीसाठी नवीन स्वप्नं रंगवली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राष्ट्रीय पुरस्कार विजेते मा. श्री. दिलीप फलटणकर होते. तसेच, भाजपा पुणे जिल्हा नेते उद्योजक श्री. सुनील शिंदे, पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. विनोद माझिरे, दैनिक प्रभातचे पत्रकार प्रवीण सातव आणि हिमालय पतसंस्थेचे संचालक सदाशिव घुले हे मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व पाहुण्यांच्या स्वागताने झाली. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणी शेअर करत शिक्षक आणि शाळेच्या सहवासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. नववीच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या नृत्याविष्काराने संपूर्ण वातावरण भारावून गेले.
“सराव, दूरदृष्टी आणि अविश्रांत प्रयत्नाने यश नक्की मिळेल,” असे मार्गदर्शन करताना दिलीप फलटणकर यांनी विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याचा आणि त्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचा संदेश दिला.
“विदाई ही समाप्ती नसून नव्या प्रवासाची सुरुवात आहे,” असे मत व्यक्त करत भाजपा पुणे जिल्हा नेते उद्योजक सुनील शिंदे यांनी पेरिविंकल स्कूल भविष्यात विद्यापीठ म्हणून नावारूपाला यावे, असा विश्वास व्यक्त केला.
चैतन्य विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि संस्थापक श्री. राजेंद्र बांदल, संचालिका सौ. रेखा बांदल आणि शिवानी बांदल यांनीही विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापिका सौ. निर्मल पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षिका इंदू पाटील, माध्यमिक विभागप्रमुख पूनम पांढरे, प्राथमिक विभागप्रमुख सना इनामदार, पूर्व प्राथमिक विभागप्रमुख पल्लवी नारखेडे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियांका खारकर आणि देविका कांबळे यांनी केले. शेवटी विद्यार्थ्यांना भेटवस्तू आणि अल्पोपाहार देऊन त्यांना भावनिक निरोप देण्यात आला.
More Stories
विद्यापीठ हायस्कूलचा दहावीचा निकाल 99.21 टक्के.
सूस,महाळूंगे मधील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आमदार शंकर भाऊ मांडेकर यांचा रविवारी भव्य जनता दरबार…
बालेवाडी येथील सी एम इंटरनॅशनल स्कूल चा शैक्षणिक वर्ष २०२४ – २५ चा इयत्ता दहावी चा निकाल १००%