February 12, 2025

Samrajya Ladha

संक्रांतीचा स्नेहमिलाप: पेरिविंकल स्कूलमध्ये हळदी-कुंकू सोहळा उत्साहात संपन्न

पिरंगुट :

परंपरा आणि संस्कृती जपत पेरिविंकल इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे १८ जानेवारी रोजी हळदी-कुंकू सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
संपूर्ण कार्यक्रमाची सुरुवात शारदा पूजनाने झाली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी दीपप्रज्वलन करून देवी सरस्वतीची आराधना केली.

 

संक्रांतीच्या निमित्ताने लहान मुलांसाठी पारंपरिक बोरन्हाण सोहळा आयोजित करण्यात आला. चिमुकल्यांना बोरं, साखर, तिळगूळ, खडे साखर, हरभरे यांचा वर्षाव करून आनंद साजरा करण्यात आला. त्यानंतर महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभ घेण्यात आला. यामध्ये प्रत्येक महिलेला औक्षण करून विविध प्रकारचे वाण देण्यात आले.

कार्यक्रमास डायरेक्टर रेखा बांदल, डायरेक्टर शिवानी बांदल, यश बांदल शाळेच्या मुख्याध्यापिका निर्मल पंडित उपस्थित होत्या.

प्रमुख पाहुण्यांनी संक्रांतीच्या शुभेच्छा देत आई-वडिलांच्या भूमिकेचे महत्त्व सांगितले. त्यांनी उपस्थित माता-भगिनींशी संवाद साधत त्यांचे आभार मानले.
या अनोख्या उपक्रमामुळे उपस्थित पालकवर्गाने आनंद व्यक्त केला. पालकांनी शाळेच्या या सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. संक्रांतीच्या निमित्ताने एकमेकांना “तिळगूळ घ्या, गोड गोड बोला” म्हणत प्रेमाचे व आपुलकीचे नाते अधिक दृढ करण्याचा संदेश देण्यात आला.परंपरा आणि नातेसंबंध सशक्त करणारा हा सोहळा पालकांसाठी अविस्मरणीय ठरला. संक्रांतीचा गोडवा अनुभवत, एकत्रित येण्याचा आनंद साजरा करत पेरिविंकल इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये हा स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात पार पडला.

शाळेच्या पर्यवेक्षिका इंदू मॅडम, माध्यमिक विभाग प्रमुख पूनम पांढरे, प्राथमिक विभाग प्रमुख सना इनामदार अणि पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख पल्लवी नारखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.
सायली ओंबसे यांनी मकरसंक्रांतीचे सांस्कृतिक व वैज्ञानिक महत्त्व स्पष्ट केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उज्वला घुने आणि रेश्मा भोसले यांनी अतिशय उत्तम पद्धतीने केले. या कार्यक्रमाला शाळेतील शिक्षकवृंद, पालकवर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You may have missed