November 21, 2024

Samrajya Ladha

आवडत्या क्षेत्रात मेहनत घेतली तर यश निश्चित : ऑलिंपिकवीर स्वप्निल कुसाळे

बावधन :

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला कांस्यपदक मिळवून देणारा रायफल नेमबाज, स्वप्नील कुसाळे याने राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल, बावधन येथे भेट दिली. स्वप्नील हा 50 मीटर रायफल थ्री पोझिशन स्पर्धेत ऑलिम्पिक पदक जिंकणारा पहिला भारतीय नेमबाज आहे. अशा या मराठमोळ्या ऑलिंपिक वीराचे पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल बावधन तर्फे शाल, नारळ, मानचिन्ह व रोख बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला. या ऑलिंपिकवीराचे सत्कार करणारी पेरिविंकल ही महाराष्ट्रामधील एकमेव शाळा ठरली. ढोल ताशांच्या गजरात स्वप्निल कुसाळे यांचे पेरिविंकल स्कूलमध्ये स्वागत करण्यात आले. तसेच पॅरिस ऑलिंपिकमध्ये सलग चार वेळा वृत्तांकन करून आलेले आंतरराष्ट्रीय पत्रकार श्री. संतोष दुधाने सर यांचाही यावेळी पेरिविंकल स्कूल तर्फे सत्कार करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमासाठी माजी आमदार शरद ढमाले, तहसीलदार रणजित भोसले, उद्योगपती संतोष जोगदाने, उद्योगपती अरुणजी शिंदे, संदीप ढमढेरे, पत्रकार विनोद माझीरे, दीपक सोनवणे, आनंद बेंद्रे, डायरेक्टर शिवानी बांदल, युथ आयकॉन यश बांदल, हे मान्यवर उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी अभ्यासात नियोजन व सातत्य ठेवले तर यश निश्चित असे आवाहन करत माजी आमदार शरद ढमाले यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.तसेच तहसीलदार रणजित भोसले यांनी ऑलिंपिक वीर स्वप्निल कुसाळे यांनी पेरीविंकल स्कूलला भेट देणे हे विद्यार्थ्यांसाठी अतिशय गौरवास्पद बाब आहे असे प्रतिपादन यावेळी केले.

या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन चैतन्य विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष व संस्थापक श्री. राजेंद्र बांदल सर व संचालिका सौ. रेखा बांदल यांच्या अध्यक्षतेखाली व पेरिविंकल समूहाच्या मुख्याध्यापिका सौ.प्रिया लढ्ढा यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षिका इंदु पाटील, कल्याणी शेळके, शिक्षक वृंद यांनी पाहिले.तसेच क्रीडा क्षेत्रात नाव उंचावण्यासाठी सतत प्रयत्नशील रहा असा सल्ला संस्थेचे अध्यक्ष श्री. राजेंद्र बांदल यांनी विद्यार्थ्यांना दिला.