November 22, 2024

Samrajya Ladha

महाराष्ट्राला आगामी काळात पहिली महिला मुख्यमंत्री मिळूदे : ॲड.पांडुरंग थोरवे

शालेय मंत्रिमंडळ शपथविधी समारंभ : विद्यापीठ हायस्कूल.

विद्यापीठ :

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या विद्यापीठ हायस्कूल,पुणे. येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून प्रशालेत शालेय मंत्रिमंडळ शपथविधी कार्यक्रम संपन्न झाला.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापीठ हायस्कूल चे माजी विद्यार्थी,मार्तंड देव,जेजुरी संस्थांचे विश्वस्त व पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड.पांडुरंग थोरवे उपस्थित होते. त्यांनी शालेय राज्यपाल यांना शपथ दिली.

विद्यार्थ्यांमधून भावी मंत्री व मुख्यमंत्री होतील अशी आशा व्यक्त करत शालेय जीवनातच विद्यार्थ्यांमधून उद्याचे सक्षम नेतृत्व उदयास येईल व ते जबाबदार नागरिक बनतील, त्यांच्या नेतृत्व गुणांचा विकास होईल असे प्रतिपादन ॲड थोरवे यांनी केले. या देशामध्ये महिलांनी राष्ट्रपती, पंतप्रधान, सुप्रीम कोर्ट न्यायमूर्ती, मुंबई न्यायालय न्यायमूर्ती, पुण्याचे जिल्हा न्यायालयाच्या पालक न्यायमूर्ती, इस्रो महिला शास्त्रज्ञ अशी नानाविध पद भूषवली आहे. आज हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेचे विद्यापीठ हायस्कूल चे शालेय मंत्रिमंडळात कु. अपेक्षा मगर यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. अद्याप पर्यंत सुसंस्कृत महाराष्ट्राची महिला मुख्यमंत्री होवू शकली नाही याची खंत आहे. महाराष्ट्रात भविष्यात होणाऱ्या निवडणुकीत जेजुरीच्या खंडोबा रायाच्या कृपेने पहिली महिला मुख्यमंत्री बनेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

विद्यार्थ्यांना मंत्रिमंडळ कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा. बालवयातच लोकशाही मूल्यांची रुजवणूक व्हावी या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. लोकमान्य टिळकांची माहिती श्रावणी झोरे व अपेक्षा मगर यांनी तर अण्णाभाऊ साठे यांची माहिती दुर्गा बोराडे या विद्यार्थिनीने सांगितली. विद्यार्थ्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित पोवाडा सादर केला.

राज्यपाल सचिन जयस्वाल याला प्रमुख पाहुणे पांडुरंग थोरवे यांनी शपथ दिली. मुख्यमंत्री अपेक्षा मगर हिला राज्यपालांनी शपथ दिली.निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी शपथ दिली . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहा वाघमारे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय चव्हाण यांनी तर आभार संध्या आवेकर यांनी मानले. स्मिता जाधव यांनी शालेय मंत्रीमंडळाच्या कामकाजाविषयी माहिती दिली व खातेवाटप केले. राज्यपाल, मुख्यमंत्री, शिक्षण (अभ्यास) मंत्री, सांस्कृतिक कार्यमंत्री, आरोग्य व स्वच्छता मंत्री, शिस्त मंत्री, प्रार्थना व परिपाठ मंत्री, वाचनालय मंत्री, क्रीडामंत्री, पर्यावरण मंत्री, सहल मंत्री, शालेय पोषण आहार मंत्री अशा विविध खात्याचे मंत्रिमंडळ तयार करण्यात आले.

मुख्याध्यापक विष्णू मोरे, शिक्षक प्रतिनिधी गौरी गोळे, वैशाली सैंधाणे, प्रमोदिनी कबुले, मनोहर निकम, रेश्मा देवकाते, तेजस्विनी निरगुडे, पल्लवी अभंग, सुप्रिया बीरज, रेश्मा पुरी, मंदा काशिद, दीपक आगवणे, चंद्रकांत कुडले, सुभाष कांबळे, अपूर्वा आदलिंगे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.