September 17, 2024

Samrajya Ladha

योगीराज पतसंस्थेच्या कृष्णानगर शाखेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार सोहळा संपन्न….

कृष्णानगर :

योगीराज पतसंस्थेच्या वतीने दहावीच्या परीक्षेत 90% पेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना माजी महापौर राहुल जाधव, ज्ञानेश्वर विद्यालय आळंदीचे सचिव अजित वडगावकर, उद्योजक भगवान पठारे, सिद्धी फार्मसी कॉलेज चे प्राचार्य डॉ. साबळे, निलेश नेवाळे यांच्या शुभहस्ते बक्षीस देऊन विशेष सत्कार करण्यात आला. तसेच याप्रसंगी वैष्णवी सायकर या विद्यार्थिनीचा एमबीबीएस झाल्याबद्दल विशेष सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर यांनी सांगितले की, आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांपैकी वडिलांचे छत्र हरविलेल्या, अतिशय प्रतिकूल परिस्थितील गीता रासकर या मुलीच्या पुढील शिक्षणासाठी संस्थेच्या वतीने दत्तक घेण्यातआले. मुलांनी मिळविलेल्या यशाचे कौतुक करून त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन द्यायचे हाच यामागील हेतू आहे. प्रत्येक वर्षी 90% पेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करायचा आणि त्यामधून 15 विद्यार्थी निवडून त्यांना दरमहा शिष्यवृत्ती द्यायची असा उपक्रम आहे. आतापर्यंत संस्थेने 165 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली आहे. याच बरोबर संस्था विविध प्रकारे करत असलेल्या सामाजिक उपक्रमाची माहिती दिली.

माजी महापौर जाधव यांनी सांगितले की, योगीराज पतसंस्था ही ” पारदर्शी कारभारा” साठी ओळखली जाते. आर्थिक क्षेत्रातली प्रगती बरोबरच संस्थेने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. इतर संस्थानी याचा आदर्श घेतला पाहिजे असेही यावेळी आवर्जून सांगितले.

उपस्थित मान्यवरांपैकी नवकुडकर या शिकवणी चालविणारे शिक्षकांनी गीता रासकर या मुलीला 10 हजार रुपये रोख बक्षीस दिले. याप्रसंगी अजित वडगावकर, भगवान पठारे, डॉ. साबळे यांनीही मार्गदर्शन केले.

याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते हनुमंत म्हेत्रे, संस्थेचे शाखा समिती सदस्य पंढरीनाथ गायकवाड, पांडुरंग सुतार, शाखा व्यवस्थापिका भाग्यशाली पठारे, पालक, खातेदार व संस्थेचा सर्व स्टाफ उपस्थित होते.

आलेल्या सर्वांचे स्वागत संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गंगणे यांनी केले तर सर्वांचे आभार संस्थेचे शाखाध्यक्ष आप्पाजी सायकर यांनी मानले.