November 22, 2024

Samrajya Ladha

पेरिविंकल शाळेत विद्यार्थ्यांनी घेतले योग साधनेचे धडे!!! योग साधना ज्ञानसाधनेचा पाया – अध्यक्ष राजेंद्र बांदल यांचे प्रतिपादन

बावधन :

चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज च्या पौड,सुस,पिरंगुट, बावधन, कोळवण व माले या सर्व शाखांमध्ये आज जागतिक योगा दिन हा योग प्राणायामाचे धडे गिरवत अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात व सतत कोणत्या ना कोणत्या उद्दिष्टाप्रत निरंतर धावणाऱ्या मानवाला योग साधनेतूनच शांतता प्राप्त करता येईल. शारीरिक स्वास्थ्य व मानसिक स्थैर्य हे मूलतत्त्व मानणाऱ्या पेरिविंकल शाळेच्या सर्व सहा शाखांमध्ये आजच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या औचित्याने सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांना योगसाधनेचे धडे दिले गेले. या सूत्राचा वापर करत योग प्राणायाम या माध्यमातून पुढील वर्षभर योग साधना सुरू ठेवण्याचा संकल्प केला गेला.

आज दि 21जून हा अंतरराष्ट्रीय योगा दिन व जागतिक संगीत दिन म्हणून साजरा केला जातो. या दोन्हीचे औचित्य साधून पेरिविंकल शाळेच्या सुस शाखेमध्ये योग गीताने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर सहजयोग यांच्या तर्फे योगासने, सूर्यनमस्कार यांचा सराव केला गेला.

तसेच ध्यानधारणा करण्यासाठी विपशन्या मार्गदर्शक श्री मुळे सर यांनी विद्यार्थ्यांना आनापान घेऊन मेडिटेशन चे फायदे सांगितले. विद्यार्थ्यांसह सर्व शिक्षकांनी ध्यानधारणा करून रोज 10 मिनटे शाळेत हा उपक्रम राबवण्याचा संकल्प केला. तसेच आज जागतिक संगीत दिनाचे औचित्य साधून सर्व विद्यार्थांचा व शिक्षकांचा डान्स मार्गदर्शक शिवप्रसाद पुजारी सर यांनी झुंबा घेतला. झुंबा करून सर्वच ताजेतवाने झाले.

तर पौड शाखेत प्राजपिता ब्रम्हकुमारी च्या सुमती दीदी, ज्योती दीदी, सुप्रिया दीदी, महेश भैया, रामकृष्ण ढोकळे, क्रीडापत्रकार संजय दुधाणे व संस्थेचे संस्थापक श्री राजेंद्र बांदल सर यांनी योग साधना घेऊन प्राणायाम व योगासनाचे अनेक प्रकार सांगून विद्यार्थ्यांकडून करवून घेतले. तसेच बावधन व पिरंगुट शाखेमध्ये देखील योगासने व सूर्यनमस्कार घेऊन योगदिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या योगतज्ञ नेहा नाडकर, ईश्वरी शर्मा, भाग्यश्री किंनगे तसेच सहजयोग च्या डॉ. शालिनी अग्निहोतत्री व श्री प्रतुल कोरटकर यांच्या सह संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल सर संचालिका रेखा बांदल मुख्याध्यापक सौ निर्मल पंडित, डॉ. अभिजित टकले, प्रिया लढढा आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व उपस्थित मान्यवरांसह निवडक विद्यार्थ्यांनी विविध आसनांच्या प्रदर्शनातून योग साधनेचे धडे गिरवले. योग दिनाचे औचित्य साधून सर्वच विद्यार्थी वर्ग व शिक्षक वृंदांकडून योगासने करून घेतली. विविध आसने , प्राणायाम व ध्यानधारणेतून एका अनोख्या मन:शांतीची अनुभूती मिळाली. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली.

या संपूर्ण कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल सर संचालिका रेखा बांदल मॅडम यांच्या संकल्पनेखाली तसेच सुस शाखेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित, पिरंगुट शाखेचे मुख्याध्यापक डॉ. अभिजीत टकले, बावधन च्या मुख्याध्यापिका प्रिया लढढा यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षक प्राजक्ता वाघवले, पूनम पांढरे, नेहा माळवदे, सचिन खोडके, इंदू पाटील, कल्याणी शेळके, सना इनामदार,पल्लवी नारखेडे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अत्यसंत शिस्तबद्ध पद्धतीने आयोजन केले होते.