September 17, 2024

Samrajya Ladha

सुनील माने यांच्या पुस्तकाचे रविवारी प्रकाशन

पुणे :

ज्येष्ठ पत्रकार सुनील माने यांच्या लेखांचा संग्रह असलेल्या ‘प्रभावांचा प्रवास’ या पुस्तकाचे प्रकाशन या रविवारी ५ मे रोजी होईल. नवी दिल्लीचे झुंजार आणि ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे यांच्या हस्ते हा प्रकाशन सोहळा होत असून, या कार्यक्रमाला पुण्याचे दैनिक लोकमतचे संपादक संजय आवटे, महाराष्ट्र टाइम्स पुणेचे निवासी संपादक श्रीधर लोणी, दैनिक सकाळ पुणेचे निवासी संपादक श्री. दयानंद माने आदी मान्यवर उपस्थित राहतील.

सुनील माने यांना पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव असून कॅटलिस्ट फाऊंडेशनच्या माध्यमातून समाजकारणातही ते कार्यरत आहेत. या जडणघडणीत त्यांना प्रभावित करणाऱ्या व्यक्ती, घटना यांच्याविषयीचे लिखाण या पुस्तकातून वाचकांसमोर आणले त्यांनी आहे. त्यांच्या व्यक्तित्वाला दिशा देणाऱ्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, अब्राहम लिंकन, आई हिराबाई यांच्या प्रभावांविषयी त्यांनी विस्तृतपणे या पुस्तकात आपले विचार मांडले आहेत. दैनिक सकाळसमूह, प्रतापराव पवार, संपादक अनंत दीक्षित यांच्याशी त्यांचे असलेले मर्मबंध यातून उलघडलेत. राजकारणापलीकडे त्यांना भावलेले गिरीश बापट, याविषयी भाष्य करताना त्यांनी गिरीश बापट यांच्या कामाच्या पद्धतीबाबत लिहिले आहे.

५ मे हा दिवस फ्रेंच राज्यक्रांतीचा दिवस आहे.या दिवशी फ्रान्स मधील सर्वसामान्य जनतेने त्यांना लुबाडणाऱ्या जुलमी राजा लुई आणि धर्मगुरूंची सत्ता उखडून टाकली होती. महाडच्या चवदारतळे सत्याग्रहावेळी डॅा. बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा याचा उल्लेख केला होता. या क्रांतीने आधुनिक जगाला स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता अशी मूल्ये दिली. त्यामुळे या दिवसाचे औचित्य साधून या पुस्तकाचे प्रकाशन होत आहे.

पुस्तकाचे प्रकाशन नवी दिल्लीचे झुंजार आणि निर्भीड पत्रकार म्हणून प्रसिद्ध असलेल्या अशोक वानखडे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. अशोक वानखेडे हे वास्तववादी राजकीय पत्रकार, स्तंभलेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्याचप्रमाणे दैनिक लोकमत पुणेचे संपादक संजय आवटे, महाराष्ट्र टाईम्सचे निवासी संपादक श्रीधर लोणी, पुणे सकाळचे निवासी संपादक दयानंद माने यांच्यासह सामाजिक, राजकीय आणि पत्रकारिता क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा पार पडेल.
—————–