November 21, 2024

Samrajya Ladha

प्रदूषणमुक्त हवेसाठी राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करणार : मुरलीधर मोहोळ

पुणे :

पुणेकरांना प्रदूषणमुक्त, शुद्ध हवा मिळावी यासाठी राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमाची (नॅशनल क्लीन एअर प्रोगॅम) प्रभावीपणे अंमलबजावणी करणार असल्याची ग्वाही पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

मोहोळ यांनी वेताळ टेकडीवर सकाळी फिरायला येणाऱ्या नागरिकांची भेट घेतली. माजी नगरसेविका छाया मारणे, अश्विनी जाधव, डॉ. संदीप बुटाला, कैलास पारीख, बाळासाहेब सुराणा, दीपक पवार, मिलिंद तलाठी, गणेश शिंदे, दत्ता गायकवाड, बाळासाहेब खंकाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

मोहोळ म्हणाले, “केंद्र सरकारने शहरांमधील वायू प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी देशातील शंभरहून अधिक शहरांत हा कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात पुणे, खडकी, पिंपरी-चिंचवड आणि देहू रोड कॅन्टोन्मेंट बोर्डाला पहिल्या टप्प्यासाठी 504 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. 2026 पर्यंत वायू प्रदूषण 25 ते 30 टक्क्यांपर्यंत कमी ठेवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या अंतर्गत पुण्याला 135 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे.”

मोहोळ पुढे म्हणाले, “सूक्ष्म धुलिकणांचे आणि अतिसूक्ष्म धुलिकणांचे प्रमाण कमी करायचे आहे. त्यासाठी पाणी शिंपडणारी कारंजी उभारणे, स्मशानभूमींमध्ये विद्युतदाहिन्या, गॅसदाहिन्यांची संख्या वाढवणे, विद्युत वाहनांची संख्या वाढविणे, वाहतूक कोंडी कमी करणे, रस्ते सफाईच्या कामात सुधारणा आणणे, सार्वजनिक वाहतुकीस प्रोत्साहन देणे, मेट्रोसाठी फीडर म्हणून 300 मिडी बसची खरेदी करणे आदी उपाययोजना करण्यात येणार आहेत. या उपायांची प्रभावी अंमलबजावणी करणार असून, पर्यावरणपूरक वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्राकडून अधिकाधिक निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा करणार आहे.”