October 5, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

भारतीय महिला सॉफ्टबॉल संघात बाणेरच्या वैष्णवी सायकरची निवड; तैवानमधील आशियाई युनिव्हर्सिटी स्पर्धेत करणार भारताचे प्रतिनिधित्व  

पुणे:

तैवान येथे पार पडणाऱ्या पाचव्या आंतरराष्ट्रीय आशियाई युनिव्हर्सिटी सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी (5th Asian Universities Women’s Softball Cup) भारतीय संघात पुण्यातील राष्ट्रीय खेळाडू वैष्णवी शिवराम सायकर हिची निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे पुण्याच्या क्रीडा वर्तुळात तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.  

वैष्णवी ही आझम कॅम्पसची विद्यार्थिनी असून ती स्थानिक पातळीवर ‘पुणे सिटी’ संघाचे प्रतिनिधित्व करते. राष्ट्रीय स्तरावर सातत्यपूर्ण व चमकदार कामगिरीची नोंद घेतल्यानंतर आता तिला आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय संघाकडून खेळण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे.  

निवड चाचणी व सराव शिबिरे:

भारतीय संघाच्या निवडीसाठी जुलै महिन्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे पहिली निवड चाचणी घेण्यात आली होती. त्यानंतर दुसरी चाचणी मध्य प्रदेशातील इंदूर येथे पार पडली. या दोन्ही चाचण्यांमधील सर्वोत्तम कामगिरीच्या आधारे भारतीय संघाची अधिकृत घोषणा करण्यात आली.  

संघाचे पहिले सराव शिबिर कोपरगाव येथे यशस्वीरीत्या पार पडले असून दुसरे शिबिर नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर २० ऑक्टोबर रोजी भारतीय संघ तैवानकडे रवाना होईल. तैवान येथे २२ ते २६ ऑक्टोबर दरम्यान ही आशियाई युनिव्हर्सिटी सॉफ्टबॉल स्पर्धा रंगणार आहे.  

या यशाबद्दल बोलताना वैष्णवीने आझम कॅम्पसचे प्राध्यापक गुलजार शेख, पुणे सिटी असोसिएशनचे सचिव अतुल शिंदे तसेच विष्णू जाधव यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाचा उल्लेख केला. तिच्या या उत्तुंग यशाबद्दल सर्व स्तरातून तिचे अभिनंदन केले जात असून आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.