September 26, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

*बाणेर गावाला आदर्श घालून देणारी मिरवणूक – वरची आळीच्या श्रीमंत शिवछत्रपती मित्र मंडळाचा स्तुत्य उपक्रम*

बाणेर :

बाणेर गावातील गणेशोत्सव म्हटला की डोळ्यासमोर येते ती भव्य मिरवणूक, कर्कश्य डीजे चा आवाज आणि ध्वनी प्रदूषण. पण या वर्षी या प्रथेला फाटा देत *वरची आळीच्या श्रीमंत शिवछत्रपती मित्र मंडळाने* एक नवा, प्रेरणादायी आणि संस्कृती जपणारा आदर्श संपूर्ण बाणेर गावासमोर ठेवला आहे, त्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.

मंडळाने यावर्षीच्या विसर्जन मिरवणुकीत डीजे ला पूर्णपणे बंदी घालून पारंपरिक वाद्यांचा गजर करण्याचा धाडसी आणि कौतुकास्पद निर्णय घेतला. या मिरवणुकीत *अमर बँडच्या सुमधुर सुरांनी, ढोल पथकाच्या थरारक गजराने आणि हलगीच्या निनादाने* संपूर्ण वातावरण भक्तिमय आणि चैतन्यमय झाले होते.

परंतु या विसर्जन सोहळ्याचे खरे मुख्य आकर्षण ठरले ते *शिव तांडव.*

शिव तांडवाच्या शक्तिशाली आणि भक्तीपूर्ण सादरीकरणाने उपस्थित प्रत्येक गणेश भक्ताच्या अंगावर शहारे आले. हा केवळ एक कार्यक्रम नव्हता, तर आपल्या संस्कृतीची, परंपरेची आणि शिवभक्तीची ज्वलंत अनुभूती होती. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी या मिरवणुकीचा मनमुराद आनंद घेतला.

आज जेव्हा सणांच्या नावाखाली ध्वनी प्रदूषण आणि अपप्रवृत्ती वाढत आहे, तेव्हा श्रीमंत शिवछत्रपती मित्र मंडळ, वरची आळी यांनी दाखवून दिले की, *डीजे शिवायही मिरवणूक अधिक आनंददायी, शिस्तबद्ध आणि संस्मरणीय होऊ शकते.* त्यांनी घालून दिलेला हा आदर्श केवळ बाणेर गावासाठीच नव्हे, तर आजूबाजूच्या सर्व मंडळांसाठी दिशादर्शक आहे.

हा उपक्रम केवळ मिरवणूक नव्हती, तर एक *प्रदूषण मुक्त, समाजोपयोगी आणि संस्कृती रक्षक* विचार होता. अशा उपक्रमांमुळे आपले सण अधिक पवित्र होतात आणि पुढच्या पिढीला आपल्या परंपरेची खरी ओळख होते.

श्रीमंत शिवछत्रपती मित्र मंडळ, वरची आळीच्या सर्व कार्यकर्त्यांनी दाखवलेली एकजूट, नियोजन आणि सामाजिक भान खरोखरच वाखाणण्याजोगे आहे.

आपण असेच समाजासाठी उपयुक्त, आनंददायी, प्रदूषण मुक्त व प्रेरणादायी गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुका यापुढेही करत रहाल, अशी शक्ती आपणास श्री गणराय देवो, हीच गणराया चरणी प्रार्थना.

अध्यक्ष – कु. बळीराम लक्ष्मण पाटुळे
सचिव – श्री. अक्षय दत्तात्रय मुरकुटे