September 29, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

योगीराज पतसंस्था सारख्या सहकारी संस्थांमुळे महाराष्ट्रातील सहकार समृद्ध — राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त अनिल कवडे

बाणेर :

महाराष्ट्राला सहकाराची गौरवशाली आणि दैदीप्यमान परंपरा लाभली आहे. योगीराज पतसंस्थेसारख्या सहकारी संस्थांमुळे महाराष्ट्रातील सहकार क्षेत्र अधिक समृद्ध आणि टिकून आहे, असे प्रतिपादन राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त अनिल कवडे यांनी केले.

योगीराज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, बाणेर यांच्या ३१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा तसेच गुणवंतांचा संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, स्नेहवन प्रकल्पाचे अशोक देशमाने यांचा सन्मान करण्यात आला. राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्राप्त पार्श्वगायिका राजेश्वरी पवार यांना ५१ हजार रुपये, स्नेहवन प्रकल्पासाठी ५१ हजार रुपये, वसुंधरा अभियान, बाणेर यांना शासनाचा वनश्री पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल २५ हजार रुपये, तसेच संपूर्ण भगवद्गीता पाठांतर करणारे चि. स्वप्निल व कु. सानवी पाठक यांना ५१ हजार रुपयांची मदत देण्यात आली.
दहावीच्या परीक्षेत ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. तसेच विक्रमी ठेव संकलन करणाऱ्या दैनंदिन प्रतिनिधींचा गौरव करण्यात आला. संस्थेची ३० वर्षे सेवा पूर्ण केल्याबद्दल संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गंगणे यांना दुचाकी भेट देऊन सन्मानित करण्यात आले. हा सन्मान अनिल कवडे, ह.भ.प. चंद्रकांत महाराज वांजळे आणि ह.भ.प. शंकर महाराज शेवाळे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

यावेळी योगीराज सोशल फाऊंडेशनचे लोकार्पण करण्यात आले. महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी योगीराज पतसंस्थेच्या वतीने ५ लाख रुपये, श्रीराम समर्थ पतसंस्थेच्या वतीने १ लाख रुपये, तर उपस्थितांच्या वतीने ५ लाख रुपये असा निधी सोशल फाऊंडेशनकडे सुपूर्द करण्यात आला.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर यांनी संस्थेच्या आर्थिक प्रगतीचा आढावा सभासदांसमोर मांडला. संस्थेच्या प्रगतीची माहिती देताना त्यांनी सभासदांना १५ टक्के लाभांश जाहीर केला. महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यास सर्व सहकारी संस्थांनी प्रत्येकी १ लाख रुपयांचा मदत निधी द्यावा, याबाबत सहकार विभागाने अध्यादेश काढावा, अशी मागणी करणारे निवेदन संस्थेच्या वतीने आयुक्त अनिल कवडे यांना देण्यात आले.

यावेळी मुल्यम एग्रॉनॉमिक्सचे सहसंस्थापक योगेश केदारी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश बालवडकर, भुजंगराव मोहिते, मदन भोईटे, माजी महापौर दत्तात्रय गायकवाड, नगरसेवक अमोल बालवडकर, बाबुराव चांदेरे, सचिन सानप, नगरसेविका मयुरी कोकाटे, गणेश कळमकर, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी अजय कदम, संपत भोसले, गणपत माडगूळकर, माजी जिल्हा न्यायाधीश सुनिल पाठक, यशराज पारखी, अशोक मुरकुटे, तानाजी निम्हण, राहुल बालवडकर, संस्थेचे शाखाध्यक्ष राजेंद्र मुरकुटे, शंकरराव सायकर, तज्ञ संचालक भानुप्रताप बर्गे, बाळासाहेब काशिद तसेच सर्व संचालक व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे स्वागत तज्ञ संचालक रविंद्र घाटे यांनी केले. आभार उपाध्यक्ष राजेश विधाते यांनी मानले. सूत्रसंचालन पूजा थीगळे यांनी केले.