October 24, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

*AIच्या साथीने विचारांची उंच भरारी; ब्राम्हण महासंघ आयोजित वक्तृत्व स्पर्धेत पेरिविंकल स्कूल ठरले प्रथम क्रमांकाचे मानकरी!*

पुणे :

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, पुणे जिल्हा शिक्षक आघाडीच्या वतीने आयोजित शिक्षक दिनाचे औचित्य साधून या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल, बावधन शाखेने घवघवीत यश प्राप्त करून शाळेच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला आहे.

पुणे, दि. ६ सप्टेंबर : कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI हे शिक्षण क्षेत्रासाठी आव्हान नसून शिक्षकांच्या ज्ञानाला, सर्जनशीलतेला आणि अध्यापन प्रक्रियेला अधिक प्रभावी बनवणारे विश्वासू साधन आहे, हा विचार प्रभावीपणे मांडत पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल, बावधन शाखेने ‘आदर्श शिक्षक पुरस्कार – वक्तृत्व स्पर्धे’त प्रथम क्रमांक पटकावत घवघवीत यश संपादन केले. पुण्यातील अग्रगण्य दहा शाळांच्या सहभागामुळे रंगलेल्या या चुरशीच्या स्पर्धेत पेरिविंकल स्कूलच्या प्रतिनिधींनी केलेल्या प्रभावी सादरीकरणाला परीक्षकांची विशेष दाद मिळाली *आणि प्रथम पारितोषिकाचा मान पेरिविंकल स्कूलच्या बावधन शाखेने पटकावला.*

६ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, टिळक रोड, पुणे येथे ही स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. स्पर्धेसाठी विचारवंत व शिक्षणतज्ज्ञ श्री. शैलेंद्र देवळणकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ अ. ल. देशमुख आणि NEP-2020च्या अभ्यासक सुलभा विधाते यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. मान्यवरांच्या उपस्थितीमुळे आणि विविध शाळांमधून आलेल्या स्पर्धकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे स्पर्धेला वैचारिक आणि शैक्षणिक स्वरूप प्राप्त झाले.
स्पर्धेसाठी ‘बदलती पिढी आणि शिक्षकांसमोरील आव्हाने’, ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’, ‘AI – शिक्षकांचा विश्वासू सहकारी’, ‘NEP-2020 अंतर्गत शालेय उपक्रम’ तसेच ‘स्पर्धा परीक्षांमुळे वर्गातील वाढलेले वर्चस्व’ असे विविध समकालीन विषय देण्यात आले होते.

पेरिविंकल स्कूलच्या प्रतिनिधींनी ‘AI – शिक्षकांचा विश्वासू सहकारी’ या विषयाची निवड करून कृत्रिम बुद्धिमत्तेचा शिक्षण क्षेत्रावर होत असलेला वाढता प्रभाव, शिक्षकांसाठी AIचे महत्त्व, अध्यापन अधिक परिणामकारक करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर तसेच AIच्या वापरातील शिक्षकाची जबाबदारी यावर अभ्यासपूर्ण आणि प्रभावी विचार मांडले.
AIच्या माध्यमातून माहिती मिळवणे, अध्यापनाचे नियोजन करणे, शैक्षणिक साहित्य तयार करणे, विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक गरजा ओळखणे, मूल्यांकन अधिक प्रभावी करणे आणि विद्यार्थ्यांच्या अध्ययनातील अडचणी समजून घेणे यांसारख्या अनेक बाबींमध्ये शिक्षकांना मोठी मदत होऊ शकते, हे पेरिविंकलच्या प्रतिनिधींनी स्पष्ट केले. मात्र, AI शिक्षकाची जागा घेऊ शकत नाही, कारण विद्यार्थ्यांच्या भावविश्वाला समजून घेणे, त्यांना प्रेरणा देणे, संस्कार करणे आणि माणूस म्हणून घडविणे ही शिक्षकाची भूमिका कोणतेही तंत्रज्ञान पूर्णपणे निभावू शकत नाही, हा अत्यंत महत्त्वपूर्ण विचार त्यांनी आपल्या मांडणीतून अधोरेखित केला. ‘AI शिक्षकाचा पर्याय नाही, तर शिक्षकाच्या हातातील प्रभावी सहकारी आहे’, या मध्यवर्ती विचाराभोवती केलेली मांडणी, विषयाची सुस्पष्टता, आत्मविश्वासपूर्ण वक्तृत्व, प्रभावी सादरीकरण आणि समकालीन शैक्षणिक संदर्भ यामुळे पेरिविंकलच्या सादरीकरणाने परीक्षकांच्या मनावर विशेष छाप पाडली आणि शाळेला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.

या स्पर्धेत पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूलसह पोतदार इंटरनॅशनल स्कूल, एम. के. एन. एस. नॅशनल स्कूल, वर्धमान विद्यालय, आर. एम. डी. स्कूल, माउंट लितेरा झी स्कूल, न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग, विमलाबाई गरवारे प्रशाला आणि ज्ञानप्रबोधिनी यांसह पुण्यातील विविध नामांकित शाळांनी सहभाग नोंदविला. प्रत्येक शाळेने विविध विषयांवर आपले विचार मांडत स्पर्धेची रंगत वाढवली. पेरिविंकल शाळेतर्फे दोन गटांनी सहभाग नोंदविला असून, विषयाची सखोल समज, मुद्देसूद मांडणी, आत्मविश्वास आणि प्रभावी वक्तृत्वाच्या जोरावर पेरिविंकल इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या बावधन शाखेच्या प्रतिनिधींनी प्रथम क्रमांकावर आपले नाव कोरले.

सहभागी शिक्षक सौ. ऋचा हल्लूर आणि सौ. लक्ष्मी परांजपे यांनी स्पर्धेच्या तयारीसाठी घेतलेले परिश्रम, विषयाचा सखोल अभ्यास, सादरीकरणाचे नियोजन आणि विद्यार्थ्यांना दिलेले मार्गदर्शन यामुळे पेरिविंकलच्या संघाला आत्मविश्वासाने स्पर्धेत उतरण्यास मोठी मदत झाली. तसेच विद्यार्थीनी रागिणी जायभाये आणि स्वरा मोकाशी यांनीही आपल्या प्रभावी सादरीकरणातून शाळेचे प्रतिनिधित्व करत या यशात महत्त्वपूर्ण योगदान दिले.

आजच्या वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षणव्यवस्थेत AIचा वाढता वापर हा चर्चेचा आणि चिंतनाचा विषय ठरत आहे. अशा परिस्थितीत तंत्रज्ञानाला घाबरण्याऐवजी त्याचा योग्य, विवेकपूर्ण आणि जबाबदारीने वापर करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्याला शिक्षण प्रक्रियेत सामावून घेणे, हा पेरिविंकल स्कूलचा सकारात्मक दृष्टिकोन या स्पर्धेतील मांडणीतून अधोरेखित झाला. पेरिविंकल स्कूलने मिळवलेला प्रथम क्रमांक हा केवळ वक्तृत्व कौशल्याचा गौरव नसून शिक्षण, तंत्रज्ञान, सर्जनशीलता आणि मानवी मूल्ये यांचा सकारात्मक समन्वय साधण्याच्या शाळेच्या प्रयत्नांना मिळालेली महत्त्वपूर्ण पावती आहे. या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, विद्यार्थी आणि पालकांकडून सहभागी शिक्षक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
AIच्या साथीने आधुनिक शिक्षणाची दिशा स्पष्ट करत आणि शिक्षकत्वाची मानवी उब जपत मिळवलेला हा प्रथम क्रमांक पेरिविंकल स्कूलच्या शैक्षणिक वाटचालीतील निश्चितच अभिमानाचा आणि प्रेरणादायी टप्पा ठरला आहे.

पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या बावधन शाखेच्या या उल्लेखनीय यशामागे शाळेचे अध्यक्ष श्री. राजेंद्र बांदल, संचालिका सौ. रेखा बांदल, शिवानी बांदल आणि शाळेच्या प्राचार्या सौ. निर्मल पंडित यांचे भरीव मार्गदर्शन लाभले. विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या टीमचे हे यश खरोखरच वाखाणण्याजोगे आहे असे प्रतिपादन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित यांनी केले.

 

You may have missed