*पेरिविंकलची खरी ताकद म्हणजे समर्पित शिक्षकांचा परिवार! – मान्यवर अभयजी भंडारी यांचा गौरवोद्गार!!*
बावधन :
चैतन्य विद्या प्रतिष्ठान संचलित पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या सर्व सहा शाखांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा शिक्षक दिन सोहळा पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, बावधन येथे उत्साहपूर्ण आणि आनंदी वातावरणात संपन्न झाला. सर्व शाखांतील शिक्षकांना एकत्र आणणारा हा विशेष सोहळा बावधन शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. शिक्षकांच्या कार्याचा गौरव, त्यांच्या योगदानाची दखल आणि पेरिविंकल परिवारातील एकात्मतेचा अनुभव देणारा हा सोहळा अविस्मरणीय ठरला.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध विचारवंत व व्याख्याते मा. श्री. अभय भंडारी सर तसेच मुळशी तालुक्याच्या सभापती मा. सौ. मंदाताई बाबाजी शेलके मॅडम उपस्थित होत्या. याशिवाय मा. श्री. संदीप ढमढेरे सर, मा. श्री. राघवेंद्र कुमार सर – ‘द हेल्मेट मॅन ऑफ इंडिया’ आणि डॉ. महेश लोहार सर यांचीही विशेष उपस्थिती लाभली त्याचबरोबर कार्यक्रमास पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष मा. श्री. राजेंद्र बांदल सर, संचालिका मा. सौ. रेखा बांदल मॅडम, संचालिका मा. सौ. शिवानी बांदल मॅडम, संचालक मा. श्री. यश बांदल सर यांच्यासह बावधन शाखेच्या मुख्याध्यापिका मा. सौ. निर्मल पंडित मॅडम, पिरंगुट शाखेच्या मुख्याध्यापिका मा. सौ. इनायत मुज्जावर मॅडम, पौड शाखेच्या मुख्याध्यापिका मा. सौ. वीणा कदम मॅडम आणि प्रशासकीय प्रमुख मा. सौ. प्राची महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.
विशेष म्हणजे, संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. राजेंद्र बांदल सर यांनी आपल्या काही पत्रकार मित्रांनाही या शिक्षक दिन सोहळ्यास विशेष निमंत्रित केले होते. पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असतानाच शिक्षण क्षेत्राशी जोडलेले असल्याने शिक्षक म्हणून त्यांच्या भूमिकेचाही यावेळी सन्मान करण्यात आला. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला आणखी एक वेगळे आणि प्रेरणादायी स्वरूप प्राप्त झाले.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांचे औक्षण व स्वागत, सरस्वती पूजन आणि दीपप्रज्वलनाने झाली. ज्ञानाची ज्योत प्रज्वलित करत शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाला मंगलमय सुरुवात करण्यात आली. त्यानंतर शिक्षक दिनाचे महत्त्व आणि शिक्षकांची विद्यार्थ्यांच्या जीवनातील भूमिका यावर प्रकाश टाकण्यात आला.
कार्यक्रमाच्या पुढील टप्प्यात मान्यवरांची औपचारिक ओळख करून देत त्यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला. त्यानंतर शिक्षकांनी सादर केलेल्या विशेष गीताने कार्यक्रमात आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण केले.
शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षकवृंदाचा सत्कार करण्यात आला.
प्रत्येक शाखेची वैशिष्ट्ये म्हणजे पेरिविंकलची सामूहिक ताकद – निर्मल पंडित मॅडम यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या मुख्याध्यापिका मा. सौ. निर्मल पंडित मॅडम यांनी आपल्या मनोगतात पेरिविंकलच्या सर्व शाखांचे विशेष कौतुक केले.
प्रत्येक शाखेची स्वतःची वैशिष्ट्ये, बलस्थाने आणि सकारात्मक बाजू असून त्या प्रत्येक शाखेचे योगदान संस्थेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. विविध शाखांची वैशिष्ट्ये अधोरेखित करत त्यांनी सर्व शिक्षकांच्या मेहनतीचे, समर्पणाचे आणि सातत्यपूर्ण योगदानाचे कौतुक केले.
“आपण सर्वजण एका कुटुंबाचा भाग आहोत,” या भावनेतून त्यांनी सर्व शाखांनी एकत्रितपणे पुढे जाण्याचे आवाहन केले. संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. राजेंद्र बांदल सर यांचे पेरिविंकलला विद्यापीठ स्तरापर्यंत घेऊन जाण्याचे स्वप्न सर्व शिक्षकांच्या टीमवर्क, एकजूट आणि समर्पणातून निश्चितच साकार होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
“शिक्षक हा विद्यार्थ्याच्या भविष्याचा शिल्पकार” – राजेंद्र बांदल सर यांचे उद्गार.. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. राजेंद्र बांदल सर यांनी आपल्या मनोगतात सर्व मान्यवरांचे स्वागत केले आणि त्यांच्या विविध क्षेत्रांतील कार्याचा गौरव केला.शिक्षकाची भूमिका केवळ विद्यार्थ्यांना विषयाचे ज्ञान देण्यापुरती मर्यादित नसून, विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्त्वाची, विचारांची आणि भविष्याची जडणघडण करण्यामध्ये शिक्षकांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले.पेरिविंकलच्या आजवरच्या वाटचालीचा उल्लेख करताना त्यांनी संस्थेने सहा शाखांमध्ये २५० हून अधिक कर्मचारी आणि ६,००० हून अधिक विद्यार्थ्यांचा मोठा परिवार उभा केला असल्याचे नमूद केले. ही प्रगती शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, व्यवस्थापन आणि सर्व संबंधितांच्या सामूहिक प्रयत्नांचे फलित असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी उपस्थित मान्यवरांचे त्यांच्या कार्याबद्दल कौतुक केले तसेच सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
आपल्या पत्रकार मित्रांना, जे स्वतः शिक्षकी पेशाशी जोडलेले आहेत, शिक्षक दिनानिमित्त विशेष निमंत्रित केल्याचेही त्यांनी सांगितले. ज्ञान आणि समाजप्रबोधन या दोन्ही क्षेत्रांमध्ये योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करणे ही अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
शिक्षणासोबत सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश मंदाताई शेलके यांनी सर्व शिक्षकांना दिला.
मुळशी तालुक्याच्या सभापती मा. सौ. मंदाताई बाबाजी शेलके यांनी उपस्थित सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. समाजातील वंचित व अनाथ मुलांसाठी त्या करत असलेल्या कार्याचा उल्लेख करत त्यांनी शिक्षणासोबत सामाजिक बांधिलकी जपण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
शिक्षक विद्यार्थ्यांच्या आयुष्यात केवळ ज्ञान देत नाहीत, तर त्यांना मूल्ये, संस्कार, आत्मविश्वास आणि योग्य दिशा देण्याचे महत्त्वाचे कार्य करतात, असे त्यांनी सांगितले. पेरिविंकलमधील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांनी त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
“शिकण्याची प्रक्रिया कधीही संपत नाही” – अभय भंडारी सर
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रसिद्ध विचारवंत व व्याख्याते मा. श्री. अभय भंडारी सर यांनी आपल्या प्रभावी आणि प्रेरणादायी भाषणातून उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनातील विविध प्रसंग सांगत त्यांच्या सकारात्मक दृष्टिकोनावर आणि शिकण्याच्या वृत्तीवर प्रकाश टाकला. ज्ञानार्जन ही आयुष्यभर सुरू राहणारी प्रक्रिया आहे, हा विचार डॉ. राधाकृष्णन यांनी आपल्या जीवनातून कसा आचरणात आणला, याची काही प्रेरणादायी उदाहरणे त्यांनी सांगितली.
शिक्षकांनी स्वतः सतत शिकत राहणे आणि त्या ज्ञानातून विद्यार्थ्यांना प्रेरणा देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिक्षक एका व्यक्तीला नव्हे, तर संपूर्ण पिढीला घडवतो, या भावनेतून त्यांनी शिक्षकांवर असलेल्या मोठ्या जबाबदारीची जाणीव करून दिली.
खासआकर्षण म्हणजे ‘हेल्मेट मॅन ऑफ इंडिया’ यांचा रस्ते सुरक्षेचा संदेश मा. श्री. राघवेंद्र कुमार सर – ‘द हेल्मेट मॅन ऑफ इंडिया’ यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. रस्ते सुरक्षेचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी हेल्मेटचा वापर हा केवळ वाहतुकीचा नियम नसून स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेची जबाबदारी आहे, असा संदेश दिला. समाजामध्ये हेल्मेट न वापरण्याची प्रवृत्ती बदलण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षक आणि शिक्षणसंस्था समाजात सकारात्मक बदल घडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, असे नमूद करत त्यांनी सर्वांनी सुरक्षिततेचा संदेश पुढे नेण्याचे आवाहन केले. सहा शाखा – एक परिवार, एक ध्येय
या संपूर्ण कार्यक्रमातून पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या सहा शाखांना एका कुटुंबाच्या भावनेने जोडण्याचा सुंदर प्रयत्न दिसून आला. प्रत्येक शाखेची वेगळी ओळख आणि वैशिष्ट्ये असली तरी संस्थेचे ध्येय एकच असून, शिक्षकांचे सामूहिक प्रयत्नच संस्थेच्या भविष्यातील वाटचालीची खरी ताकद असल्याचा संदेश या सोहळ्यातून देण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी बावधन शाखेच्या शिक्षक व कर्मचाऱ्यांनी घेतलेले अथक परिश्रम विशेष उल्लेखनीय ठरले. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन, मान्यवरांचे स्वागत, सत्कार, सांस्कृतिक सादरीकरणे आणि विविध व्यवस्थापनाची जबाबदारी त्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडली.
कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शन आणि पसायदानाने झाली. त्यानंतर सर्व मान्यवर, शिक्षक व कर्मचारी यांच्यासाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले.
एकूणच, ज्ञान देणाऱ्या प्रत्येक गुरूचा सन्मान करणारा, सहा शाखांना एका कुटुंबाच्या भावनेने जोडणारा आणि शिक्षकांच्या समर्पणातून पेरिविंकलची वाटचाल अधिक उंचीवर नेण्याचा संकल्प दृढ करणारा हा शिक्षक दिन सोहळा अत्यंत उत्साहात आणि यशस्वीपणे संपन्न झाला.
संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन हे संस्थेचे संस्थापक आदरणीय श्री राजेंद्र बांदल सर, संचालिका, सौ. रेखा बांदल मॅडम, शिवानी बांदल मॅडम, यश बांदल सर, व सौ. निर्मल पंडित यांच्या कणखर नेतृत्वाने, व पर्यवेक्षिका सायली गायकवाड व सौ. शिरीन काझी, तसेच सर्व शिक्षकवृंद यांच्या आयोजनाने संपन्न झाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पर्यवेक्षिका सायली गायकवाड यांनी केले.





























More Stories
सुसगावमध्ये आज दहीहंडी उत्सव निमित्त श्री कानिफनाथ महाराज पुरस्कार वितरण सोहळा..
पिरंगुट पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गोपाल कला उत्साहात साजरी
पर्यावरणस्नेही गणेशोत्सवासाठी औंध आणि बोपोडीत ‘इको फ्रेंडली गणेश मूर्ती कार्यशाळा’; नगरसेवक सनी निम्हण यांचा उपक्रम