September 4, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

पर्यावरणस्नेही गणेशोत्सवासाठी औंध आणि बोपोडीत ‘इको फ्रेंडली गणेश मूर्ती कार्यशाळा’; नगरसेवक सनी निम्हण यांचा उपक्रम

औंध :

उत्सवाचा उत्साह आणि पर्यावरणाचे रक्षण यांचा मेळ घालत भावी पिढीमध्ये निसर्गाप्रती संवेदनशीलता रुजवण्यासाठी औंध व बोपोडी परिसरात ‘इको फ्रेंडली गणेश मूर्ती कार्यशाळे’चे आयोजन करण्यात आले आहे. नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या पुढाकारातून ही कार्यशाळा येत्या रविवार, ६ सप्टेंबर २०२६ रोजी दोन वेगवेगळ्या सत्रांमध्ये संपन्न होणार आहे.

 

आपल्या संस्कृतीचा वैभवशाली सोहळा असलेला गणेशोत्सव साजरा करताना पर्यावरणाचा समतोल राखणे ही काळाची गरज बनली आहे. लहान मुलांच्या मनात बाप्पाच्या भक्तीसोबतच निसर्गाची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने या कार्यशाळेचे नियोजन करण्यात आले आहे.

कार्यशाळेची ठळक वैशिष्ट्ये व तपशील:

 वयोगट विभागणी: ७ ते १२ वर्षे आणि १२ वर्षांवरील मुले अशा दोन स्वतंत्र गटांमध्ये ही कार्यशाळा होईल.

 सकाळचे सत्र: सकाळी १० वाजता — कै. इंदिरा गांधी प्राथमिक शाळा, औंध.

 सायंकाळचे सत्र: सायंकाळी ५ वाजता — ज्येष्ठ नागरिक हॉल पार्किंग, बोपोडी.

कार्यशाळेत मुलांना शाडूच्या मातीपासून स्वतःच्या हाताने पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाईल.

“गणरायाच्या कृपेने लाभलेली ही सुंदर सृष्टी जपण्यासाठी यंदाचा गणेशोत्सव प्रत्येकाने पर्यावरणस्नेही पद्धतीने साजरा करणे गरजेचे आहे. बालवयातच ही मूल्ये रुजावीत म्हणून या कार्यशाळेचे आयोजन केले असून परिसरातील नागरिकांनी व पालकांनी आपल्या पाल्यांसह मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,” असे आवाहन नगरसेवक सनी विनायक निम्हण यांनी केले आहे.